चंद्रपूर : उत्तर चंद्रपूर वनविभागातील तीनही विभागात वनसंरक्षणासोबतच वन्यजीव संरक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यामुळे वनविभाग खडबडून जागे झाले असून वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नैसर्गिक व कृत्रीम ९९ पाणवठे तयार करण्यात आले आहे.पावसाने दडी मारल्यामुळे राज्याच्या काही भागात पाणी टंचाईसदृष्य स्थिती निर्माण झाली असली तरी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नैसर्गिक पाणवठे आहेत. काही ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहे. उन्हाळ्याचे दिवसात कृत्रीम पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच काही पाणवठ्यांचे खोलीकरण सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी या प्रदेशातील विभागाचे जंगलात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. उत्तर चंद्रपूर प्रदेशात ६३ नैसर्गिक व ३६ कृत्रीम असे एकूण ९९ पाणवठे आहेत. त्यापैकी ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभागात ९ नैसर्गिक व १७ कृत्रीम असे एकूण २६ पाणवठे, मध्य चांदा वनप्रकल्प विभागात २९ नैसर्गिक व १४ कृत्रीम असे एकूण ४३ पाणवठे व पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागात २५ नैसर्गिक व ५ कृत्रीम असे एकूण ३० पाणवठे आहेत.वनविकास महामंडळाची निर्मिती निकृष्ट दर्जाच्या वनाचे रुपांतर उत्कृष्ठ दर्जाच्या वनामध्ये करण्याकरिता २५ आॅक्टोबर १९७४ रोजी झालेली आहे. त्या धोरणानुसार वनविकास महामंडळाने अनेक क्षेत्रात उत्पादक वने तयार केलेली आहे व मानवनिर्मित उत्पादक सागाची वने तयार झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र वनविकास महामंडळाला हस्तांतर करण्याची कोणतीही कार्यवाही चालू नाही अथवा प्रस्तावित नाही, असे उत्तर चंद्रपूर वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी कळविलेले आहे.वनविकास महामंडळाद्वारे १९८७ नंतर साफ तोड बंद करण्यात आलेली असून केंद्र शासनाने तांत्रिक दृष्ट्या मान्यता प्राप्त क्षेत्रात ओव्हरवूड रिमूव्हल करून रोपवन घेण्यात येते. त्यात प्रति हेक्टरी ४० वनौषधी फळझाडे राखीव ठेवण्यात येते व सेक्शन लाईन क्षेत्र वगळण्यात येते. (शहर प्रतिनिधी)
वन्यप्राण्यांसाठी पुन्हा ९९ पाणवठे केले सज्ज
By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST