कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे मधुमेह, उच्चरक्तदाब आदी व्याधी असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेक वेगवेगळ्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील काही नागरिकांना कोरोनामुक्तीनंतर म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजारासह विषाणूजन्य इन्फेक्शन होण्याचे प्रकार समोर आले. रक्त घट्ट होणे, गाठ येणे, हाडे ठिसूळ होणे... अशा एक ना अनेक विविध तक्रारी संबंधित रुग्ण सहन करीत आहेत. या आजारामुळे त्रस्त होणारे नागरिक आता शासकीय रुग्णालयातील पोस्ट कोविड ओपीडीत धाव घेत आहेत, तर अनेक रुग्ण खासगी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेत आहेत. वाढलेल्या या तक्रारी पाहता, आपल्याला कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
बॉक्स
कोरोनातून बरा, पण श्वसनाचा त्रास
कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना श्वसनाचा त्रास, प्रचंड डोकेदुखी आदींचा त्रास होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये श्वसनाचे विविध विकार असल्याच्या तक्रारी अधिक आहेत. यासोबतच चालताना दम लागणे, फुफ्फुसाचे विविध आजार जडले आहेत.
बॉक्स
बरे झाल्यानंतरही घ्या काळजी
कोरोनामुक्त झाल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुक्तीनंतर काही काळ दगदग न करता आराम करणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेण्यासह चांगला व सकस आहार घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योगा करणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
बॉक्स
पोस्टकोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
कोरोनाचा धोका सुरुवातीपासूनच व्याधीग्रस्त ज्येष्ठांना होता. पोस्ट कोविड रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोनामुक्तीनंतर श्वास घेण्यास त्रास होणे, चालताना दम लागणे यासह इतर होणारे आजार अधिक प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतर ज्येष्ठांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
बॉक्स
कोरोनामुक्तीनंतर ज्येष्ठांमध्ये म्युकरमायकोसिस या आजारासह रक्त घट्ट होणे, गाठी येणे, हाडे ठिसूळ होणे आदी आजार आढळून येत आहेत. तसेच लहान मुलांमध्ये कोरोनामुक्तीनंतर दोन ते सहा आठवड्यात एमआयएससी आजार आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, योगा व श्वसनासंबंधी व्यायाम करणे गरजेचे आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर