चंद्रपूर: रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला दिलेली ४ जी केबल टाकण्याची परवानगी व टॉवर्स उभारणी प्रकरण चांगलेच गाजत आहे. मनपा प्रशासन याबाबत सकारात्मक आहे तर मनपाच्याच नगरसेवकांचा याला विरोध आहे. या पार्श्वभूमिवर आज गुरुवारी महानगरपालिकेने शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी असोसिएशन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अभ्यासू नागरिकांना चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत सर्वांनी टॉवर्स उभारताना ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. असे न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला.महानगरपालिकेच्या २९ मेच्या आमसभेत रिलायन्स जीओला शहरात ४ जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्याची परवागनी देण्यात आली. प्रारंभी कोणत्याही नगरसेवकांनी याला विरोध दर्शविला नाही. मात्र त्यानंतर याला नगरसेवकांकडून विरोध होऊ लागला. खुद्द सत्ताधारी काँग्रेसच्याच नगरसेवकांनी याविरोधात बंड पुकारले. भाजपाच्याही नगरसेवकांनी त्यांना समर्थन देत रिलायन्स जीओला विरोध दर्शविला. या पार्श्वभूमिवर ३० जूनला झालेली आमसभा याच मुद्यावरून चांगलेच गाजली. या प्रकारामुळे महापालिकेतील काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आली. सध्या या विषयाकडे हॉट विषय म्हणून बघितले जात आहे. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने रिलायन्स जीओच्या ४ जी केबल प्रत्यारोपण, टॉवर्सची उभारणी, यामुळे मानवी आरोग्यावर कितपत धोका होऊ शकतो, हे तपासून बघण्याकरिता शहरातील सामाजिक संस्थांना व अभ्यासू नागरिकांना चर्चेसाठी पाचारण केले. आज सायंकाळी ही चर्चा झाली. यावेळी महापौर संगिता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रितेश तिवारी, आयुक्त सुधीर शंभरकर, उपायुक्त राजेश मोहिते, ग्रिन प्लॅनेटचे प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे बंडू धोतरे, प्रहारचे पप्पू देशमुख, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. टेलीकम्युनिकेशन विभाग, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, केंद्र व महाराष्ट्र शासनाने टॉवर्स उभारणीसाठी काही गाईड लाईन दिल्या आहेत. याची काटेकोर अंमलबजावणी केली जात असेल तरच टॉवर्स उभारा, अशी भूमिका सर्व सामाजिक संस्थांनी यावेळी घेतली. दवाखाना, शाळा-कॉलेज, वृध्दाश्रम आदींच्या जवळ टॉवर असू नये, शिवाय ७० टक्के नागरिकांचा आक्षेप असेल त्या ठिकाणीही टॉवर्स उभारू नये, असेही यावेळी सांगण्यात आले. ४ जी केबलच्या टॉवर्सचा मानवी आरोग्यावर परिणाम होतोच, हे स्पष्ट करताना संस्थांनी हा परिणाम कमितकमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
गाईडलाईनसाठी आग्रही भूमिका
By admin | Updated: July 3, 2014 23:28 IST