नियोजनशून्यतेचा परिणाम : हवालदिल शेतकऱ्यांची मागणीभेजगाव : यावर्षी पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने शेतकरी काहिसा सुखावला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह असोलामेंढा तलावही तुडूंब भरला असल्याने या तलावाच्या भरोशावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. या तलावाचा सलंग जवळपास दीड महिन्यापासून निघाला असून सिंचन विभागाने आठ दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले आहे. मात्र केवळ सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेने भेजगाव परिसरात तलावाचे पाणी पोहचलेच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन वर्षाच्या दुष्काळी स्थितीनंतर यावर्षीतरी असोलामेंढा तलावाचे पाणी शेतीसाठी मिळेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.सततचा दुष्काळ, नापिकी, धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मात्र यावर्षी पावसाने साथ दिल्याने आसोलामेंढा तलाव भरले आहे. त्यामुळे या परिसरात संपूर्ण पिक चांगले होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तलावाच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी सिंचन विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कालवे दुरूस्ती करणे गरजेचे होते. मात्र सिंचन विभागाने दहा वर्षांपासून कालव्यातील कचरा, गवत, गाळ काढलेच नाही. त्यामुळे कालव्यात अनेक प्रकारची झुडपे वाढली आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या नहरावरील गोसीखुर्दचे कामे अर्धवट असल्याने पाणी पूरवठ्यास अडचण निर्माण होत आहे.मूल तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरत असलेला हरणघाट उपसा सिंचन प्रकल्प ४९२०.५२ लाख रु. खर्च करून २०१० ला पूर्णत्वास आला. या प्रकल्पामुळे भेजगाव परिसरातील आठ गावांना फायदा होतो. या योजनेसाठी वेगळे काळवे नसल्याने गोसेखुर्दच्या नहरातूनच पाणी पुरवठा होतो. सिंचन विभागाचे नियोजन नसल्याने या शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होतो. यामुळे टोकापर्यंत पाणी पुरवठा होत नाही. सिंचन विभागाने जातीने लक्ष घालून पाणी वाटप समिती स्थापन करून रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा करणे गरजेचे झाले आहे. मात्र सिंचन विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. (वार्ताहर)
असोलामेंढाचे पाणी भेजगाव परिसराला द्या
By admin | Updated: August 22, 2016 01:53 IST