वासाळा मेंढा येथील प्रकार : इतर शेतकऱ्यांसाठी नवा प्रयोग दिशादर्शकलोकमत शुभवर्तमानघनश्याम नवघडे नागभीडकेवळ धान आणि धान याच एका पिकात आपले अख्खे आयुष्य खर्ची घालण्याची संस्कृती असलेल्या नागभीड तालुक्यातील वासाळा मेंढा येथे शेतीचा नवा प्रयोग होत आहे. धानाला पर्याय म्हणून शेवग्याची लागवड. हा जर प्रयोग यशस्वी झाला तर तो या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.वासाळा मेंढा येथील शेतकरी रेवन मधुकर नुकारे यांनी बीड जिल्ह्यातील कृषी अधिकारी गहणीनाथ नामदेव जाधोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग केला आहे. सलग पाच एकर शेतात त्यांनी शेवग्याची लागवड केली असून आंतर पीक म्हणून झेंडू, वांगी व अन्य पीके घेत आहेत.शेवग्याची लागवड करण्यात आली ती शेतजमीन अतिशय खडकाळ स्वरुपाची असून या जमिनीतून धानाचे पीक घेणेसुद्धा अतिशत जिकरीचे आहे. अशा खडकाळ जमिनीत करण्यात आलेली शेवग्याची लागवड अन्य शेतकऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. सदर प्रतिनिधीने या शेतीस भेट देऊन अधिक माहिती घेतली असता पाच एकरात तीन हजार शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली. २० जूनपासून रोपण करण्यात आलेल्या या झाडांनी आता चांगलेच बाळसे धरले असून ही झाडे आता बहरायला आली आहेत. काही दिवसातच शेंगा लागण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल. पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक विहिर असून नुकतीच येथे एक विंधन विहिर खोदण्यात आली आहे. ठिबक सिंचन पद्धतीने या शेवग्याच्या झाडांना पाणी देण्यात येत आहे. झाडांमध्ये लागवड करण्यात आलेल्या वांगी, झेंडू, तीळ, तूर, मिरची, ढेमसे, पालक, मेथी, सांभार या आंतर पिकांचीही स्थिती उत्तम असून ही पीकेसुद्धा लाखांवर रुपयांचे उत्पन्न देऊ शकतात.शेवग्याच्या या शेतीस पहिल्याच वर्षी खर्च मोठ्या प्रमाणात येतो. नंतरच्या वर्षात हा खर्च नगण्य असतो. शिवाय पाणीही कमी लागत असल्याची माहिती रेवन सुकारे यांनी दिली. रेवनने या संबंधीचे कुठलेही प्रशिक्षण घेतले नसून केवळ गहणीनाथ जाधोर यांच्या मार्गदर्शनात काम करीत असल्याचे रेवन म्हणाला. धान आणि धान, वांगी, मिरची, कोबी ही पारंपारिक पिके नागभीड तालुक्यात आजवर अनेकांनी घेतली. पण वासाळा मेंढा येथे शेवग्याचा होत असलेला प्रयोग खरोखरच नाविण्यपूर्ण आहे. नागभीड तालुक्यातील कृषी विभागाने या प्रयोगाची दखल घेऊन इतर शेतकऱ्यांना प्रेरीत करण्याची गरज आहे. आयुष्यभर धान हे पारंपारिक पीक घेऊन कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वासाळा मेंढा येथे होत असलेला शेवग्याचा प्रयोेग प्रेरणादायी आहे.
धानाला पर्याय म्हणून शेवग्याची लागवड
By admin | Updated: November 7, 2015 00:42 IST