Gautami Patil reaction, Video Leak: व्हिडीओ लीक प्रकरणानंतर पहिल्यांदाच मिडियाशी बोलली गौतमी पाटील, वाचा काय म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 22:36 IST2023-03-04T22:35:03+5:302023-03-04T22:36:54+5:30
गौतमी प्रतिक्रिया देताना काहीशी भावनिक झाल्याचं दिसून आलं.

Gautami Patil reaction, Video Leak: व्हिडीओ लीक प्रकरणानंतर पहिल्यांदाच मिडियाशी बोलली गौतमी पाटील, वाचा काय म्हणाली...
Gautami Patil reaction, Video Leak: अल्पावधीतच तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेली नृत्यांगनागौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. गौतमी पाटील हिचा एका कार्यक्रमाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ लीक झाला होता. एका कार्यक्रमाच्या जागी ती कपडे बदलत असताना अज्ञात व्यक्तीने तिचा व्हिडीओ शूट केला आणि तो व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकराचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. तसेच, अशा घाणेरड्या मनोवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शासन केले जायला हवे, असाही सूर दिसून आला. तशातच आता, या व्हिडीओ लीक प्रकरणानंतर पहिल्यांदाच गौतमी पाटील हिने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने काही गोष्टींबद्दल रोखठोक मतं मांडली.
आक्षेपार्ह प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील पहिल्यांदाच मंचावर नृत्य सादरीकरणाला आली होती. नाशिकला तिचा कार्यक्रम होता. त्यावेळी तिने मिडियाशी संवाद साधला. "मला आधी प्रेक्षकांचे प्रेम मिळत होते. आताही मला अजून जास्त प्रेम मिळतंय. त्यामुळे मला छान वाटतं. खरं पाहता जो प्रकार घडलाय त्यानंतर माझी बोलण्याची मनस्थिती नाही. पण लोकांच्या प्रेमामुळेच मला ऊर्जा मिळाली आणि मी तुमच्यासमोर आली आहे. लोक माझ्यासोबत आहेत याचा मला खूप अभिमान आहे. आपल्याला लोकांची साथ आहे, याचं मला समाधान आहे," असे गौतमी म्हणाली.
व्हिडीओ शूट आणि लीक करून व्हायरल करण्याचा जो प्रकार घडला त्याबाबत मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. या प्रकाराची निंदा साऱ्यांनीच केली आहे. या प्रकाराची दखल महिला आयोगानेही घेतली आहे. तसेच या प्रकरणाबद्दल कायदेशीर कारवाईही सुरू आहे. त्यामुळे मी या विषयावर काहीही बोलू शकत नाही. माझी पोलिसांकडे सध्या कोणतीही विशेष मागणी नाही. माझं पोलिसांशी जे बोलणं सुरू आहे त्यात मी समाधानी आहे. आमचं बोलणं सुरू राहिल आणि मी त्यांना सहकार्य करेन. बाकी याबाबत मी जास्त काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही, असंही गौतमी काहीसं भावनिक होत म्हणाली.