बुलडाणा : पावसाने दडी मारल्यामुळे यावेळी ऑगस्ट महिन्यात अवघा ४0 टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊससुद्धा अनियमित, अपुरा व सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने धरणांमधील जलसाठा २८ टक्के एवढाच आहे. धरणांची ही स्थिती शहरांमधील पाणीपुरवठा प्रभावित करणारी ठरत असून, दमदार पाऊस न आल्यास सप्टेंबर अखेर बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार या शहरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
** सहा शहरांना पुरेल वर्षभर पाणी बुलडाण्यातील शेगाव, खामगाव, मेहकर, चिखली, मलकापूर, जळगाव जामोद या शहरांना होत असलेल्या पाणीपुरवठय़ाचा स्त्रोत पुरेसा असल्यामुळे जून ते जुलै २0१५ पर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. मलकापूर शहराला हतनूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो तर चिखलीला पेनटाकळी, मेहकरला कोराडी, खामगावला ज्ञानगंगा व शेगावला वान धरण येथून पाणीपुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असल्याने जून २0१५ पर्यंत पाणी उपलब्ध होऊ शकते. जळगाव जामोद शहराला पाणीपुरवठा करणार्या गोडाडा धरणासह चार विंधन विहिरींची मदत घ्यावी लागणार आहे.
** देऊळगावराजा शहराला पीरकल्याण धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या शहरासाठी खडकपूर्णा योजनेमधूनही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे; मात्र ती पूर्ण झालेली नाही. सद्यस्थितीत पीरकल्याण धरणात २.२0 दलघमी जलसाठा आहे व हा साठा सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेसा आहे. दरम्यानच्या काळात दमदार पाऊस न आल्यास खडकपूर्णामधून टँकरने पाणी पुरवावे लागेल. सोबतच पिंपळगाव चिलमखाँ येथून पाईपलाईन टाकावी लागेल.
** सिंदखेडराजा शहरालासुद्धा पीरकल्याण धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात पुरेसा जलसाठा निर्माण झाला नाही तर ऑक्टोबर २0१४ पासून संपूर्ण शहराला खडकपूर्णा धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
** लोणार शहराला देऊळगाव कुंडपाळ या धरणातून पाणीपुरवठा होत असून, आज २६ ऑगस्ट रोजी या धरणामध्ये केवळ 0.१६ दलघमी एवढाच जलसाठा आहे. दमदार पाऊस न आल्यास पुढील महिन्याच्या अखेरीस शहराची तहान टँकरनेच भागवावी लागेल.
** नांदुरा शहराला पाणीपुरवठा करणार्या ज्ञानगंगा धरणामध्ये १३.२२ दलघमी जलसाठा आहे. या शहराचा काही भाग विंधन विहिरीवर अवलंबून असल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आणखी १५ विंधन विहिरी घ्याव्या लागणार आहेत. सद्यस्थितीत ज्ञानगंगेचा जलसाठा हा जुलै २0१५ पर्यंंत पुरेसा आहे.
** बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणार्या येळगाव धरणात २.१0 दलघमी जलसाठा असून, नोव्हेंबर २0१४ पर्यंत शहरवासीयांना पाणी सहज उपलब्ध होऊ शकते; मात्र दरम्यानच्या काळात पाऊस न आल्यास बुलडाण्याला पेनटाकळी धरणाचा आधार घ्यावा लागणार आहे. पेनटाकळीमध्ये सद्यस्थितीत २३.६४ दलघमी जलसाठा असून, या धरणावरून अस्तित्वात असलेली तातडीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी लागेल.