लोणार (जि. बुलडाणा), दि. १९ : वन विभागाने गुरे चारण्यावर बंदी घातल्याने लोणारमधील शेकडो पशुमालकांनी गुराढोरांसह तहसीलवर १९ ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी पशुमालकांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन गुरांच्या चार्याची व पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.वन विभागाने आपल्या क्षेत्रात शहरातील शेतकर्यांना चराईकरिता बंदी घातली, यामुळे पशुधनासाठी काय व्यवस्था करावी, असा प्रश्न शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे. शासन एकीकडे विविध योजनेतून शेतकर्यांना जोडधंदा म्हणून शेळ्या, मेंढय़ा, गायी, म्हशीचे अनुदान देऊन पशुधन पालनाकरिता प्रोत्साहित करीत आहे. मागील तीन वर्षांंपासून तालुक्यात झालेल्या अल्प पावसामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. यावर्षी सध्या चांगला पाऊस झालेला आहे. त्यात गुराढोरांना चांगला चारा उपलब्ध झाल्याने दूध उत्पादक शेतकर्यांना आर्थिक आधार मिळू लागला आहे. मात्र अचानक वन विभागाने फतवा काढला व गुरांना वन विभागाच्या हद्दीत चराई बंदी केली. गेल्या अनेक वर्षांंपासून लोणार येथील शेतकर्यांची गुरे वन विभागाच्या क्षेत्रात मुक्त चरत होती. चराई बंदीच्या अचानक काढलेल्या फतव्यामुळे पशुमालकांसमोर आपली जनावरे कशी जगवावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मराठवाड्याप्रमाणे एक तर चारा छावणी सुरू करावी किंवा पूर्वीप्रमाणे वनक्षेत्रात चराईसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शेतकर्यांतर्फे धनसिंग राठोड, राहुल जाधव, विशाल गवई, केशव गव्हाणे, अरुण जावळे यांच्यासह शेकडो पशुमालक उपस्थित होते.
पशुमालकांचा तहसीलवर जनावरांसह ठिय्या
By admin | Updated: August 20, 2016 02:30 IST