नाना हिवराळे / खामगाव
शाळा, महाविद्यालय परिसरात १00 मीटर अंतरापर्यंत धूम्रपान करणे अथवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यावर निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी त्यांचे उल्लघन केले जात आहे. शहरासाहेबतच ग्रामीण भागातही याचे प्रमाण वाढत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीत आढळले. येथे धूम्रपानबंदी कायदा केवळ कागदावरच राहिला आहे. सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. शालेय परिसरात अशी विक्री होत असल्याने प्राथमिक शाळेत शिकणार्या लहान मुलांपासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत अनेक जण या पदार्थांच्या आहारी गेले आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातही शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सहज पानटपरी व दुकानांवर उपलब्ध असल्याचे सर्वश्रुत आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ८0 हजार रुग्णांना तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचा वैद्यकीय शाखेचा अहवाल आहे. देशात सुमारे १६ टक्के लोक सिगारेट ओढतात, ४४ टक्के लोक विड्या, तर उरलेले बहुतांश गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. सिगारेट, विडी तंबाखूजन्य पदार्थ असल्याने अनेकांना याची सवय होते. एकदा या व्यसनांच्या अधीन झाल्यानंतर त्यांची सवय मोडणे दुर्मीळ होते. युवा पिढी या व्यसनांच्या अधीन झाली आहे. खामगाव शहरात जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये, आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतन तसेच खाजगी संस्था आहेत. या शालेय परिसरात पानटपरी व खाऊचे पदार्थ विकणार्यांकडून तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याची विक्री होत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. शाळेच्या फावल्या वेळात अनेक विद्यार्थी या दुकानावर गर्दी करताना आढळतात. तंबाखूजन्य पदार्थांंची विक्री राजरोसपणे चालू असतानाही याकडे मात्र कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान होत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तंबाखूजन्य पदार्थांंच्या सेवनाने होणार्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.