मेहकर : शहरातील मुख्यरस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेसह वाहधारकांना कमालीचा त्रास होत असून, वाहतूक पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर डॉ.शिंदे यांच्या दवाखान्याजवळ, इंद्रप्रस्थचौक, जुने बसस्थानक, पोलिस स्टेशनसमोर, लोणार वेस, बस स्थानकासमोर यासह ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. खड्डयांमुळे रस्त्याची चाळणी झाली असून, रस्ता संपूर्णपणे खड्डेमय झाला आहे. डॉ.शिंदे यांचे दवाखान्याच्या जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या घाणीमुळे तुडूंब भरल्याअसून नाल्यातून जाणारे पाणी हे मुख्य रस्त्यावर येत आहे. रस्त्यात असलेल्या खड्डयात हे पाणी साचते, त्यामुळे या रस्त्यावरुन जातांना वाहनधारकांना त्या खड्डयाचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी वाहने खड्डयात जातात. त्यामुळे किरकोळ अपघातही होतात. रस्त्यावर येणार्या पाण्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी सुद्धा झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला तर कधी रस्त्यावर अनेक वाहने उभी असतात. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवितांना अडचण येऊन वाहतुकीची कोंडी होते. सर्वसामान्यांच्या या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे सतत दुर्लक्ष होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पांडे, वाघ, भराड, किटे व मुंढे या पाच पोलिसांची नेमणूक केलेली आहे. मात्र हे वाहतूक पोलिस शहरातील वर्दळ असलेल्या ठिकाणी न थांबता शहराबाहेर अवैध वाहनांच्या पाठीमागेच फिरतांना दिसतात. मात्र बायपासवर वाहतूक सुरळीत असतांना त्याठिकाणी हे वाहतूक पोलिस नित्यनियमाने हजर दिसतात. रस्त्यामधील खड्डे व पोलिसांचे सतत होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य जनता व वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
खड्डय़ांमुळे वाहतुकीची कोंडी
By admin | Updated: September 25, 2014 01:15 IST