बुलडाणा : विधानसभा मतदारसंघाची दिवसेंदिंवस वाढणारी व्याप्ती लक्षात घेता अपक्ष उमेदवारांची मोठी दमछाक होताना दिसते. कोणत्याही पक्षाचे पाठबळ न घेता अपक्ष निवडणूक लढविणे उमेदवारांना पेलवत नाही, हे अपक्षांच्या घटत्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या आठ विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला असता तब्बल २६८ अपक्षांनी आतापर्यंंंत निवडणूक लढविली असून, केवळ चौघांनाच आमदारकी प्राप्त करता आली आहे. सुबोध सावजी, तोताराम कायंदे, चैनसुख संचेती व डॉ.राजेंद्र शिंगणे या चार नेत्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळविला आहे. यांच्या व्यतिरिक्त इतर अपक्षांना विजय गाठता आला नाही.सर्वच मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना विजय मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. १९९५ मध्ये मलकापूर मतदारसंघातून चैनसुख संचेती यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व विजय प्राप्त केला. संचेती यांनी तब्बल ३९ हजार ४९२ मते घेतली. याच निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघातून डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी अपक्ष निवडणूक लढविली व विजयी झाले. त्यांनी ७१ हजार १४५ मते घेतली. सिंदखेडराजा मतदारसंघाने अनेकदा अपक्षांची पाठराखण केली आहे. त्यामध्ये १९९0 मध्ये तोताराम कायंदे यांचाही समावेश आहे. त्यांनी जनता दलाचा पराभव केला होता. १९८५ मध्ये सुबोध सावजी यांनी काँग्रेस एसचा पराभव केला होता. त्यांनी ३१ हजार ८१७ मते घेतली होती.
अपक्षांना विधानसभा पेलवेना
By admin | Updated: August 28, 2014 00:50 IST