अशोक इंगळे ल्ल सिंदखेडराजा तालुक्यात १0५ गावे असून, ७९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सुमारे ५0 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा कागदावरच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसत आहे. सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत एकूण ७९ ग्रामपंचायती आहेत. यावर्षी ५0 टक्केपेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. कित्येक गावात शेतकरी आणि शेतमजुराच्या हाताला काम नाही. शेतकरी आणि शेतमजुराला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीचे प्रस्ताव बोलावून ते मंजूर करण्याचे अधिकार ग्रामसेवकाला आहेत. प्रत्येक गावात २ ऑक्टोबरला ग्रामसभा बोलावून या कामाचा निपटारा करावयाचा असतो. तालुक्यात ७९ पैकी ४३ ग्राम पंचायतीच्या निवडणुका ४ ऑगस्टला होऊन ९ सप्टेंबर रोजी सरपंच उपसरपंचाची निवड झाली. जेमतेम एक महिनाही निवडीला झाला नसल्याने ग्रामपंचायतमधील कामकाजाची माहिती त्यांना नाही. ग्रामसेवक सांगतील तसा किंवा त्यांनी लिहून ठेवलेल्या ठरावावर निमूटपणे सह्या करा, असा फंडा काही ग्रामसेवकांनी राबविला आहे. अल्पभूधारक, दारिद्रय रेषेखालील कार्डधारक यांना या विहिरीचा लाभ घेता येतो. ज्याच्याकडे शेती आहे, त्यांच्याजवळ दारिद्रय़रेषेचे कार्डच नाही. पाच एकरा खालील शेतकर्यांनी विहिरीसाठी अर्ज करावा, तो ग्रामसभेत मंजूर करुन पंचायत समितीला पाठवावा, अशी त्याची पद्धत आहे. गावात दवंडी देणे, ग्रामसभेची माहिती देणे ही प्रथम, दिवशीची पद्धत आहे; पण तसे होत नाही. अनेक शेतकर्यांना मनरेगा म्हणजे काय? हेच समजले नाही. तालुका कृषी अधिकारी यांनीसुद्धा जलयुक्त शिवार योजनेसंबंधित ग्रामसभेत माहिती देऊन ज्या शेतकर्यांना जलयुक्त शिवार योजनेत कामे करावयाची आहेत, त्यांनी नावे द्यावीत, असा ठरावही घेण्याचे सांगितले होते. ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश होते; परंतु तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने २ ऑक्टोबर रोजी कोणतीच मोहीम राबविली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
५0 टक्के ग्रामसभा कागदावरच!
By admin | Updated: October 7, 2015 01:54 IST