आगार प्रमुख अनभिज्ञ : तिकीट हरविल्याने पुन्हा तिकीट काढण्यास महिला प्रवाशाचा नकारतुमसर : एका महिला प्रवाशाने बसची तिकीट काढली, परंतु ती हरविली म्हणून पुन्हा तिकीट काढणार नाही असा पवित्रा घेतला. विना तिकीट पुढच्या प्रवासावर वाहकाने हरकत घेतली. यात वाद झाल्याने यशवंती बसस्थानकावर माघारी नेली. याचा फटका बसमधील इतर प्रवाशांना बसून मन:स्ताप सहन करावा लागला. ही घटना शुक्रवारी ११ वाजता घडली.तुमसर आगाराची यशवंती बस एम.एच. ०७ सी ७०३६ तुमसरवरून तिरोडा येथे निघाली. तुमसर रोड येथे गोंदिया महामार्गावर वाहकाने बसमधील प्रवाशांना तिकीट देताना एका महिला प्रवाशाजवळ तिकीट आढळली नाही. त्या महिला प्रवाशाने मी तिकीट काढली होती, परंतु प्रवासादरम्यान ती हरविली असेल असे उत्तर दिले. पुन्हा तिकीट काढा असे वाहकाने सांगितले. त्या महिला प्रवाशाने पुन्हा तिकीट काढणार नाही असा पवित्रा घेतला. वाहकाने विना तिकीट प्रवास न करू देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वाहकाने बस (यशवंती) परत तुमसर येथे नेण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशाने भरलेली यशवंतीच्या इतरांना मात्र कमालीचा मानसिक मनस्ताप सहन करावा लागला. विना तिकीट प्रवास करू दिला व पुढे बसची तपासणी झाली तर माझ्या नोकरीवर गदा येणार यामुळे वाहकाने हा निर्णय घेतला असे इतर प्रवाशांनी लोकमतला सांगितले. या संदर्भात बसस्थानक प्रशासन मात्र अनभिज्ञ दिसले. वाहन व चालकाच्या निर्णयाचा प्रवाशांना मात्र चांगलाच फटका सहन करावा लागला. (तालुका प्रतिनिधी)
अन् यशवंती प्रवाशांना घेऊन माघारी परतली
By admin | Updated: November 10, 2015 00:46 IST