पवनी : प्रसारमाध्यमे दररोज शिक्षण क्षेत्राविषयी नवनवी भाष्य करतात. विविध माध्यमातून शालेय शिक्षणाचे विदारक चित्र उभे करण्यात येते. यासर्वांच्या अभिप्रायांचा सारांश एकच असतो. शाळेतील मुलांना काहीच येत नाही. या परिणामकारक ठरलेला व खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना हुशार बनविणारा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी शिक्षण दिनानिमित्त मुख्याध्यापक, शिक्षकांना पाठविलेल्या संदेशात दिलेले आहे.शाळेतील मुलांना काहीच येत नाही, पाचवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही आणि सातविचा विद्यार्थी चौथीचे गणित सोडवू शकत नाही, अशी राज्यातील शिक्षणाची र्चा वारंवार होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी राज्यशासन आणि प्रथम फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. शिक्षण संचालनालय, विद्या परिषद आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे पथदर्शी कार्यक्रम यशस्वी झाला. उपजिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यातील १०० शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार दुपारच्या भोजनापुर्वीच्या दोन तासिकामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुलांमध्ये मिसळून हसत खेळत शिकविले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांचे गट करण्यात आले. त्यांच्या नेमक्या उणिवा हेरून त्यांना शिकविले. शब्द व वाक्यांचा वारंवार सराव देवून गणिती उदाहरणांचा खूप सराव करून घेण्यात आला. १०० दिवसांतील या उपक्रमामुळे अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमुलाग्रह सुधारणा झाली. हा प्रायोगिक तत्वावरील कार्यक्रम या शैक्षणिक वर्षात राज्यभर कार्यान्वित करण्याचा शिक्षण विभागाचा मानस असून विद्या परिषदेद्वारे त्याचे नियोजन करण्यात येत असून महिनाभरात वाचन, लेखन सुरू करण्यात येईल, अशी माहिती पत्राद्वारे संवाद करताना शिक्षण सचिवांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना हुशार बनविणारा प्रकल्प राज्यात राबविणार
By admin | Updated: September 6, 2014 23:33 IST