पालोरा (चौ.) : पवनी पोलीस ठाणे अंतर्गत गावामध्ये खुलेआम अवैध दारू व सट्टा व्यवसायाला ऊत आला आहे. अनेक कुटूंब उघड्यावर पडले आहेत. अवैध दारू विक्री करणारे दुकानदार रात्र दिवस विक्री करीत असल्यामुळे प्रशासनाच्या परवाना असलेले दारू दुकाने ओस पडत आहेत. अवैध दारू विक्रीमुळे गावात अशांतता पसरलेली आहे. पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप जनतेनी केला आहे. अशा अवैध व्यावसायीकावर लगाम केव्हा लागणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.विदर्भाची काशी म्हणून पवनी शहर प्रसिद्ध आहे. पवनी शहरात वॉर्डावॉर्डात अवैध मोहफुलाची व देशी दारूची अवैध विक्री होत असल्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. दारूमुळे गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दारू, सट्टा, जुगारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दारूमुळे अनेकाच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम पडत आहेत तर अनेक झंूज देत आहेत. दारूचा व्यसनाधीन झालेले काहीही करायला मागे पुढे पाहत नाही. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कुटुंबावर पडत आहे. आजगाव येथे प्रवासी निवाराच्या सभोवताल उघड्यावर खुलेआम दारू विकली जाते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना दारूड्यापासून त्रास सहन करावा लागतो.एकट्या आजगावात जवळपास अवैध दारू दुकाने आहेत. हे दुकाने येणाऱ्या जाणाऱ्यांना उघड्या डोळ्यानी दिसतात. मात्र पोलीस विभागाला का दिसत नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे. भुयार येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवार भिंतीला लागून व पानटपरीतून अवैध व्यवसाय केले जात आहे. शहरापासून तर गावागावात अवैध व्यवसाय सुरू आहेत. अनेक अधिकारी येतात व जातात. मात्र याकडे सर्वच दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)
अवैध व्यावसायिकांवर लगाम केव्हा लागणार?
By admin | Updated: March 14, 2015 00:50 IST