कारवाईची मागणी : कोका येथील शेतकऱ्याचे ८० हजाराचे नुकसान, जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षकाकडे तक्रारकरडी (पालोरा) : कोका येथील शेतकरी दुर्योधन हातझाडे यांची वडिलोपार्जीत शेतजमीन बोंडे शिवारात आहे. लागून असलेल्या एक हेक्टर अतिक्रमणीत वनजमिनीवर त्यांनी जय श्रीराम धानाची लागवड केली. त्याच गटात अनेक शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. मात्र तुमसर राऊंड आॅफीसर चोपकर यांनी वनकर्मचाऱ्यांना हाताशी धरून हातझाडे यांच्या धान पिकावर तणनाशकाची फवारणी करून ८० ते ९० हजाराचे नुकसान केल्याची तक्रार जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे.कोका येथील शेतकरी दुर्योधन तेजराम हातझाडे यांच्या मालकीची शेतजमिन पालोरा त.सा.क्र. ३२ ता.मोहाटी गट क्रमांक ५९ (एकुण क्षेत्र ०.५९ हे आर) मध्ये आहे. त्या जमिनीला लागून नाल्याशेजारी गट क्रमांक ८१ असून त्यामध्ये एक हेक्टर जागेत हातझाडे यांचे वडीलोपार्जीत वनजमिनीवर अतिक्रमण आहे. यावर्षी त्यांनी अतिक्रमित वनजमिनीवर जय श्रीराम धानाची लागवड केली. तुमसर येथील राऊंड आॅफीसर यांनी कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता चोपकर यांनी वनरक्षक, देशमुख, वनकर्मचारी विनायक शेंडे, शरद शेंडे, छगन राऊत व मुनेश्वर बांडेबुचे यांना हाताशी धरून दुपारच्या सुमारास तणनाशकाची फवारणी करून पूर्ण एक हेक्टर जमिनीवरील धान जाळले. यात जवळपास ८० ते ९० हजाराचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. फवारणी सुरु असताना श्ेतकरी व मजूर यशवंत रहाटे शेतावर त्यांना दमदाटी करण्यात आली. प्रकरणी वनाधिकाऱ्यांची तक्रार मोहाडी ठाणेदारांना देण्यात आली असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. न्यायासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मोहाडी यांना तक्रार देण्यात आली. मात्र अजूनपर्यंत चौकशी झालेली नाही. वनाधिकाऱ्याला वाचविण्याचा प ययत्न होत असल्याचा हातझाडे यांचा आरोप आहे.यापूर्वीही झाले वादविवादमागील वर्षी सुद्धा याच अतिक्रमीत जमिनीसंबंधाने राऊंड आॅफिसर चोपकर, वनकर्मचारी व शेतकरी यांच्यात वादविवाद झाले होते. प्रकरणी करडी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. नंतर मात्र सामंजस्याने प्रकरण मिटविण्यात आले. यावर्षी सुद्धा चोपकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून धान पऱ्याची नासधूस करून नुकसान करण्यात आले असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.इतर अतिक्रमणधारकांवर कारवाई नाहीवनजमिन गट क्रमांक ८१ मध्ये दुर्योधन हातझाडे यांचे अतिक्रमणाबरोबर लागूनच बोंडे, कोका येथील ४ शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. तसेच गट क्रमांक ८१ जवळील गट क्रमांक ६५, ६६ मध्ये सुद्धा कोका येथील दोन शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. त्यांनी सुद्धा वनजमिनीवर धानपिकाची रोवणी केली आहे. मात्र इतर शेतकऱ्यांना रोवणी करण्यास जमीन वापरण्यास मनाई केली जात नाही. तणनाशकाची फवारणी केली नाही. यावरून जाणीवपूर्वक एकाच शेतकऱ्याला टारगेट ठरविण्यात आल्याचे दिसून येत आहे. इतरांवरही का कारवाई केली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. वनाधिकाऱ्यावर कारवाईची मागणी हातझाडे यांनी केली आहे.जाणीवपूर्वक प्रकरणात गोवण्याचा प्रयत्नतक्रारदार हातझाडे कडून जाणीवपूर्वक प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. १ सप्टेंबरला मी आणि सर्व वनकर्मचारी संपावर होतो. त्यामुळे त्यांच्या शेतावर जाण्याचा किंवा तणनाशकाची फवारणी करण्याचा प्रश्नच येत नाही. यासंबंधाने वरिष्ठांना विचारणा केली असता त्यांना सत्यता सांगण्यात आली आहे. गावातच कुणाशी त्यांचे वैर असेल मात्र ते वनकर्मचाऱ्यांवर विनाकारण संशय घेत असल्याची प्रतिक्रिया तुमसर राऊंड आॅफीसर चोपकर यांनी लोकमतला दिली. (वार्ताहर)
वनाधिकाऱ्याची धानावर तणनाशकाची फवारणी
By admin | Updated: September 9, 2014 23:15 IST