जंगले विरळ : वन्यप्राणीही सापडले संकटात, अधिकारी, लोकप्रतिनिधी उदासीनदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यातील जंगले दुर्लक्षित असल्याने त्यातील मौल्यवान वनसंपदा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जंगले आता विरळ होऊ लागली आहे.भंडारा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी व तुमसर हे सात तालुके आहेत. भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, तुमसर, जांब (कांद्री), लेंडेझरी, नाकाडोंगरी आणि लाखांदूर या वनक्षेत्राचा समावेश आहे. या विभागात ३८ परिमंडळ असून नियत क्षेत्रांची संख्या १५६ एवढी आहे. जिल्ह्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल होते. आता बहुतांश जंगले विरळ होत आहे. अवैध वृक्षतोड होत असल्याने जंगलासोबतच आता वन्यप्राण्यांवरही संकट ओढवले आहे. त्यामुळे वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत. मोर, ससे, हरिण, काळवीट आदी प्राणी तर जंगलात दिसेनासे झाले आहे. शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वन्यप्राण्यांवर मानवी संकट कोसळले आहे. त्यांना जंगलात जगणे कठीण झाले आहे. मानवाने स्वत:च्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जंगलातील या विविध वन्यप्राण्यांची शिकार करण्यास सुरूवात केली आहे. जंगलातील मुके प्राणी मानवाच्या पोटाची आग शांत करीत आहे. त्यांना जगण्यासाठी योग्य वातावरण नसल्याने त्यांची प्रजातीच आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने वन्यप्राण्यांवर आभाळ कोसळले आहे. पुढील पिढीला या जंगलांत वन्यप्राणी होते, हे सांगूनही खरे वाटणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने आता उपाययोजना करण्याची गरज आहे. या जंगलांच्या सुरक्षेसाठी जुन्या पर्यटन स्थळांचा विकास अथवा नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्याची गरज आहे. मात्र शासन, प्रशासन, पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आता ही बाबदेखील अशक्य वाटत आहे.भंडारा जिल्ह्यात अनेक इतिहासकालीन ठिकाणे आहेत. या परिसरात जंगल आहे. तेथे पूर्वी नागरिक विरंगुळा म्हणून पर्यटनालाही जात होते. तेथे आपला थकवा, शिण विसरत होते. मात्र कालांतराने ही पर्यटन स्थळे दुर्लक्षित झाली. आता तेथे पर्यटन स्थळ होते, असे म्हटले तरी खरे वाटणार नाही. जिल्हयात वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने वनमाफीयांना रान मोकळे झाले आहे. याकडे शिलेदाराचे लक्ष जात नाही काय? असा सवाल आहे.
मौल्यवान वनसंपदा नामशेष होण्याचा मार्गावर
By admin | Updated: November 2, 2015 00:45 IST