पालोरा चौ़ : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र पाण्याचे स्त्रोत भरपूर प्रमाणात असले तरी दिवसेंदिवस पाण्याचा उपसा वाढत आहे. परिणामत: भूगर्भात पन्नास फुटावर लागणारे पाणी शंभर फुटाच्या वर गेले आहे. आतापासून सर्वत्र पाण्याची टंचाई दिसून येत आहे. वैनगंगा नदीच्या पवित्र्यात असलेला भंडारा जिल्ह्यातील चौरास पट्टा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे.पवनी तालुक्यात सभोवताल बाराही महिने पिक देणारी कसदार जमीन आहे. भूगर्भात भरपूर पाण्याचा स्त्रोत असल्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड उपसा करून वर्षभर पीक घेत आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पाण्याचा प्रचंड उपसामुळे भूगर्भातील रेती वाळवंटाचे रुप देत आहे. प्रत्येक नागरीक भूगर्भातील पाणी मिळविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जात आहे. पूर्वी हाताने खोदलेल्या विहिरीला पाणी लागत होते. आता मात्र पाणी लागत नसल्यामुळे यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने पाण्याचा शोध घेणे सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी नाहिशी होऊन रेती व दगड मिळत आहेत. या भागात मोटार पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. भंडारा जिल्ह्यात चौरास क्षेत्र लाखांदूर व पवनी तालुक्यात येतो. लाखांदूरला चुलबंद नदी व पवनीला वैनगंगा नदी वाहते. या नद्या वरदान ठरत असल्या तरी मानवाच्या लापरवाहीमुळे सर्वत्र वाळवंट होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहे. पाण्याचा उपसा भरपूर केला जात आहे. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यात झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जीरवा, अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. पवनी तालुक्यातील जिथे नाले, ओढे आहेत त्यातील पाणी वाया जावू नये म्हणून शिवकालीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जागोजागी विहिरी बांधण्यात आल्या आहेत. सर्वत्र पाण्याची पातळी खोल गेली तरीही रात्रंदिवस मोटारपंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करून शेतकरी पिक घेत आहेत. विहिरी कोरड्या पडल्या तरी तळाशी बोअर करून पाण्याचा उपसा सुरू आहे.दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. मात्र पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. पावसाच्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांवर बंदी करणे गरजेचे आहे. परंतु या प्रमुख बाबीकडे शासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात चौरास भाग वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे तर्क सुज्ञ नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
पाण्याचा उपसा भूजल पातळीत घट
By admin | Updated: November 15, 2015 00:28 IST