लोकमत विशेषइंद्रपाल कटकवार भंडारावनतस्कर तथा वन्यप्राण्यांपासून बचावाकरिता वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पिस्तूल देण्यात आल्या होत्या. मात्र नवीन गाईडलाईन्सनुसार वनपाल व वनरक्षकांनाही एसएलआर बंदुका देण्यात येणार आहेत. या आशयाचे प्रशिक्षणसुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. लवकरच वनपाल व वनरक्षकांच्या हाती बंदुका दिसणार आहेत.जिल्ह्यातील वनक्षेत्राचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याप्रमाणे वनतस्करांची संख्याही मोठी आहे. विशेषत: संरक्षित जंगलात वनतस्करांची लॉबिंग असून सरेआम सागवनासह मौल्यवान वृक्षांची कत्तल केली जाते. तुमसर, साकोली व भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत झाडांच्या कत्तलीचे प्रमाण मोठे आहे. विशेषत: तुमसर आणि साकोली क्षेत्रात वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असून त्यावर नजर ठेवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांकडे सोई सुविधा तोकड्या आहेत. वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच संरक्षणाच्या दृष्टीने साधने उपलब्ध आहेत. परंतु ज्यांच्या खांद्यावर जंगलाची सुरक्षा कायम आहे अशा वनपाल व वनरक्षकांजवळ संरक्षणात्मक सुविधा नाहीत. जंगलात गस्त घालीत असताना या कर्मचाऱ्यांचा जीव नेहमी दावणीला असतो. वनतस्करांकडून केव्हाही हल्ल्याची शक्यता असताना गस्त घालायची कशी असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना सतावत असतो. तद्वतच वन्यप्राण्यांपासूनही या कर्मचाऱ्यांना धोका आहे. विशेषत: वन्यप्राण्यांपेक्षा वन्यतस्करांचा धोका हा मोठा समजला जातो. याच दृष्टीकोणातून वनविभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर वनपाल व वनरक्षकांना बंदूका देण्याचे ठरविले होते. त्याअंतर्गत या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले. नाशिक, नागपूर व भंडारा येथे या कर्मचाऱ्यांना बंदुका चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण वरिष्ठ पातळीवर देण्यात आल्याने वनविभागाने वनतस्करांवर लगाम लावण्यासंदर्भात गांभीर्याने भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यातील वनक्षेत्रांतर्गत ८५ च्या वर बिट असून जवळपास १५० कर्मचाऱ्यांना बंदूका देण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती आहे. वरिष्ठ पातळीहून या संदर्भात दिशानिर्देश व गाईडलाईन्स प्राप्त झाल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. तुमसर आणि साकोली वनपरिक्षेत्रांतर्गत तस्करांची संख्या लक्षात घेता विशेष भरारी पथकांतर्गत चमूची निवड केली जाणार आहे. यात या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. या कर्मचाऱ्यांमुळे वनतस्करांवर लगाम लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आधी रेंजर लेव्हलवर अधिकाऱ्यांना बंदूका दिल्या जात होत्या. परंतु कनिष्ठ कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक दृष्टीकोणातून बंदूका मिळणार असल्याने या कर्मचाऱ्यांचेही मनोबल निश्चितच वाढणार आहे. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
वनपाल, वनरक्षकांना मिळणार बंदुका
By admin | Updated: February 18, 2015 00:29 IST