टिन शेडचा अभाव : पाच रेल्वे स्थानकांवर शौचालय, प्रसाधनगृह नाही, तुमसर टाऊन तिरोडी मार्गावरील व्यथामोहन भोयर तुमसरजागतिक दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे विभाग तुमसर टाऊन ते तिरोडी दरम्यान पाच रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांकरिता साधे शौचालय तथा प्रसाधनगृहाचे बांधकाम करू शकले नाही. शेकडो प्रवासी या रेल्वे स्थानकावर सिमेंट शेड नसल्याने वृक्षाच्या खाली बसून रेल्वे गाडीची प्रतीक्षा करीत आहेत. तुमसर टाऊन येथे प्रतिक्षागृहात साधे सिमेंटीकरण केले नाही. नागपूर विभागात हा रेल्वे मार्ग दुसऱ्या क्रमांकाचे आर्थिक उत्पन्न रेल्वेला मिळवून देते हे विशेष.तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान ब्रिटीशकालीन रेल्वे मार्ग आहे. दोन राज्यांना जडणारा हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. चिखला, डोंगरी (बुज) तथा मध्यप्रदेश राज्यातील तिरोडी येथील जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणी आहेत. मॅग्नीज वाहतुकीकरिता ब्रिटीशांनी हा रेल्वेमार्ग तयार केला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी हा रेल्वेमार्ग उपेक्षित आहे. सध्या या रेल्वेमार्गावर दिवसात सहावेळा प्रवासी गाड्या धावतात. या मार्गावरून महिन्यातून १२ वेळा मॅग्नीज वाहतूक करणाऱ्या मालगाड्या जातात.या रेल्वेमार्गावर तुमसर टाऊन, मिटेवानी, चिचोली, गोबरवाही, डोंगरी (बुज), सुकळी, महकेपार व तिरोडी ही रेल्वे स्थानके आहेत. त्यापैकी गोबरवाही, डोंगरी (बुज) व तिरोडी रेल्वे स्थानकावर शौचालय व प्रसाधनगृहे आहेत. उर्वरीत तुमसर टाऊन, मिटेवानी, चिचोली, सुकळी, महकेपार या रेल्वेस्थानकावर शौचालय व साधे प्रसाधनगृह नाही. यामुळे महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होते. या पाच रेल्वे स्थानकावर अगदी लहान लहान सिमेंट टीन शेडचे शेड तयार केले आहेत. उर्वरीत शेकडो प्रवाशी झाडाखालीच गाडीची प्रतीक्षा करतात. पावसाळ्यात, उन्हाळ्यात व हिवाळ्यातही प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.तुमसर टाऊन येथे रेल्वेने प्रवाशांकरिता प्रतीक्षालय तयार केले आहे. परंतु तिचे सिमेंटीकरण केले नाही. गिट्टी तेथे उखडलेली असून मातीवजा फ्लोरिंग दिसते. किमान प्रतीक्षालय येथे दर्जेदार तयार करण्याची गरज आहे. या रेल्वेमार्गावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मुलींची संख्या अधिक आहे. प्रसाधनगृहाअभावी त्यांची मोठी गैरसोय येथे होते. रेल्वेचे येथे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. नागपूर विभागात दुसऱ्या क्रमांकाचा मार्गनागपूर विभागात तुमसर - तिरोडी रेल्वेमार्ग रेल्वेला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा रेल्वे मार्ग आहे. चिखला, डोंगरी (बु.) व तिरोडी येथून महिन्यातून किमान १२ मॅग्नीज वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या धावतात. एका रेल्वेगाडीचे आर्थिक उत्पन्न ४० लक्ष रेल्वेला प्राप्त होते. वार्षीक आकडा ५७ कोटी ६० लक्ष इतका आहे. प्रवाशांपासून रेल्वेला वेगळे उत्पन्न येथे मिळत आहे.‘ड’ गटात मोडणारे रेल्वे स्थानकतुमसर - तिरोडी दरम्यान रेल्वे स्थानक ‘ड’ गटात येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासन येथे खर्च करण्यास इच्छूक नाही. रेल्वे प्रवाशी झाडाखाली आश्रय घेतात याची माहिती रेल्वे प्रशासनाला आहे. त्याचा उल्लेखही रेल्वे प्रशासन माहिती भरताना करते हे विशेष. ज्या रेल्वेस्थानकांचे उत्पन्न कमी असते तिथे सोयीसुविधा नियमानुसार करावे लागते अशी माहिती आहे.
प्रवासी करतात झाडाखाली रेल्वेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:33 IST