चुल्हाड (सिहोरा) : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गात वास्तव्य करणार्या कुटुंबीयांना शौचालय बांधकाम-नळ जोडणीकरिता अनुदान देणारी योजना राबविण्यात आली असली तरी मोहगाव (खदान) येथील लाभार्थ्यांंना तब्बल १५ महिन्यानंतरही अनुदान प्राप्त झाला नाही. यामुळे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.ग्रामीण भागात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गात वास्तव्य असलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम आणि नळ कनेक्शन देण्यात येणारी योजना राबविण्यात आली आहे. ही योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने क्रियान्वित केली आहे. या योजनेंतर्गत शौचालय बांधकाम ११ हजार आणि नळजोडणी ४ हजार, असे १५ हजार रुपये अनुदान देणारी योजना राबविण्यात आली आहे. फेब्रुवारी २0१३ या महिन्यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांंनी घराघरात शौचालय बांधकाम आणि नळ कनेक्शन प्राप्त केली आहेत. अल्पशा अनुदानात गरीब लाभार्थ्यांंनी शौचालयाचे बांधकाम केली आहेत. अनेकांनी उसनवारीवर साहित्यांची खरेदी केली आहे. परंतु या लाभार्थ्यांंना गेल्या १५ महिन्यांपासून छदामही देण्यात आलेला नाही. मोहगाव (खदान) गावात असे शौचालय बांधकाम करणारे २२ लाभार्थी व नळ कनेक्शन धारक २३ लाभार्थी वंचित आहेत. या संदर्भात जिल्हा परीषद तथा पंचायत समितीमध्ये एकाच पक्षाची सत्ता असल्याने अच्छे दिन येण्यासाठी लाभार्थ्यांंनी लोकप्रतिनिधींना वर्षभरापासून अजीजी केली आहे. सभापती कलाम शेख यांनीही ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना धारेवर घेतले आहे.या अधिकार्यांसोबत तू-तू-मै-मै केली आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. लाभार्थ्यांंच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत. असा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेत नाहीत. अच्छे दिनाला विभागांचा विरोध असल्याचा आरोप होत आहे. लाभार्थ्यांंना अनुदान प्राप्त करताना तांत्रिक अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे. गावात १५ हजाराचा अनुदान वाटप करण्यासाठी यंत्रणेने पाचव्यांदा सर्वेक्षण केला आहे. गावात लाभार्थ्यांंच्या घरी शौचालय आणि नळ कनेक्शन आहेत. प्रत्यक्षात उपलब्ध असतानाही अनुदान देताना विलंब करण्यात येत आहे. यामुळे यंत्रणेची मानसिकता दिसून येत नाही. नळयोजना पूर्ण करताना असा सर्वेक्षण होत नाही. लाभार्थी टक्केवारी देत नसल्याने हेतुपुरस्पर अनुदान वाटप करण्यास विलंब करण्यात येत असल्याचा आरोप लाभार्थ्यांंनी केला आहे. लाभार्थ्यांंना न्याय देण्यासाठी भांडणार्या लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाही. यामुळे चांगले दिवस येण्याची अपेक्षा गैर आहे. मोहगाव खदान परिसरातील अनेक गावांमध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. अनेकदा नागरिकांनी याविषयी लोकप्रतिनिधींसह तालुका प्रशासनाला समस्यांची जाणीव करून दिली. मात्र प्रत्येकवेळी त्यांना आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. परिणामी नागरिकांत रोष आहे. (वार्ताहर)
शौचालय बांधकामासाठी अनुदानाची प्रतीक्षा
By admin | Updated: May 29, 2014 23:48 IST