नदी पात्रातून रेतीचा उपसा : माडगी, देव्हाडा येथील नदी पात्र कोरडे मोहन भोयर तुमसर जीवनदायिनी वैनगंगा नदी ऐन डिसेंबर महिन्यातच कोरडी पडली आहे. नदीपात्रात भेगा पडल्या असून बेसुमार रेती उत्खननामुळे नदी पात्रात मातीचमाती दिसून येत आहे. मांडवी-वाहनी येथील बॅरेजमुळे नदीपात्रात माशांमध्ये कामलीची घट झाली आहे. येथे मासेमार बांधवावर उपासमारीची पाळी आली आहे. तुमसर तालुक्यात जीवनदायीनी वैनगंगेचा सुमारे ३५ कि़मी. चा प्रवास करते. बपेरा ते सुकळीपर्यंत वैनगंगा नदी तालुक्यातून वाहते. वैनगंगा नदी पात्रात उच्च दर्जाची रेती आहे. दरवर्षी किमान चार ते पाच रेतीघाटांचा लिलाव महसूल प्रशासन करीत आहे. पर्यावरणाचे नियम पाळण्याची हमी, रेती उत्खननाची नियमावली शासन घाट लिलावाप्रसंगी पुढे करते, परंतु सर्रास नियमबाह्य रेती उपसा मागील काही वर्षापासूनसुरू आहे. थातुरमातूर कारवाईचा बडगा महसूल प्रशासन उगारतो, नंतर सर्व जैसे थे सुरू राहते. तुमसर तालुक्यातील माडगी, चारगाव, सुकळी, बाम्हणी, तामसवाडी, मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे नदीपात्रात रेती नाही. माडगी व देव्हाडा येथे नदी पात्रात मातीच माती असून त्यातही भेगा पडलेल्या आहेत. निश्चितच पर्यावरणाला येथे धोका आहे. रेती उत्खनन करतानी येथे नियम पायदडी तुडविल्या गेले आहेत. उमरवाडा, बोरी, कोष्टी, रेंगेपार येथे सुमारे ४८ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. दरवर्षी नदीपात्र गावाच्या दिशेने सरकत आहे. गाव गिळंकृत घेण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. काही रेती माफियांना लोकप्रतिनिधींचे अभय आहे. शासन व प्रशासन मूग गिळून गप्प आहे. पाठपुरावा करणार वैनगंगा नदी पात्रातून रेतीचा अनेक वर्षापासून उपसा सुरू आहे. देशात गंगा नदी बचाव अभियान सुरू आहे. त्याप्रमाणे वैनगंगा नदी बचावाकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यटन विकासाअंतर्गत निधी देऊन माडगी परिसर सुशोभित करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य खेमराज पंचबुद्धे यांनी सांगितले. रेल्वे व मोटार पुलाला धोका मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर माडगी येथे दोन पूल आहेत. तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर एक मोटार पूल आहे. या तीनही पुलाच्या खांबाजवळ रेती नाही. रेतीमुळे पूल सुरक्षित राहतो, असे स्थापत्य विभागाचे अभियंते सांगत असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंदिराला संरक्षक भिंत माडगी देव्हाडा येथील नदीपात्रात २०० फूट दगळी शिलेवर भगवान नृसिंह व विरसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. अण्णाजी महाराजांची समाधीस्थळ आहे. पावसाळ्यात नदीला मोठा पूर येतो. पूर्वी मंदिराच्या सभोवताल दगड व रेतीसाठा प्रचंड होता. हळूहळू रेतीसाठा गायब झाला. दगड येथे उघडे पडले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने पर्यटन विकास निधीतून मंदिराच्या संरक्षणाकरिता मोठी भिंत बांधली आहे. वैनगंगा नदी बचावाकरीता लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना पुढे येण्याची गरज आहे.
वैनगंगा नदीपात्रात भेगा
By admin | Updated: December 28, 2016 02:02 IST