करडी (पालोरा) : करडी येथे सन २0१४ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करण्यात आले. सदर कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला. कामावर न गेलेल्या स्त्रि-पुरुषांचे नावे पेमेंट काढले गेले. तलावातून काढलेले गाळ शेतकर्यांच्या शेतात न घालता राजकीय व्यक्तींच्या प्लाटवर घातले गेले. एकूणच रोहयो कामे अर्धे आम्ही अर्धे तुम्ही या धर्तीवर केले गेल्याची तक्रार गावकर्यांनी केली आहे.करडी येथे रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे व गाळ शेतकर्यांच्या शेतावर टाकण्याचे काम हाती घेतले गेले. योजनेनुसार खोलीकरणात निघालेले गाळ शेतकर्यांच्या शेतात त्यांच्या मागणीनुसार घालायचे होते. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने शेतकर्यांकडून सातबारा मागविला. शेतकर्यांनी दिलेल्या सातबारानुसार प्रती किती ट्रॅक्टर गाळ शेतकर्यांना द्यायचे याचे नियोजन केले गेले. मात्र त्यानंतर काही दिवसातच नियोजनाला मूठमाती देत मनमर्जीने कामे करणे सुरू झाले.खोलीकरणातून निघालेली माती शेतकर्यांच्या शेतात न घालता ग्रामपंचायत कमेटी व प्रथम पुरुष यांच्या संगनमताने गावातील काही लोकांच्या प्लॉटवर घालण्यात आली.गावातील सहकारी सेवा संस्था यांच्या जागेवर माती घालण्याची आवश्यकता असतानासुद्धा पूर्ण प्लॉटवर माती घालण्यात आली नाही. कामावर कधीही न गेलेल्या पुरुष व स्त्री मजुरांचे नावे वेतन काढल्या गेले.सदर रोजगार हमीचे कामकाज काम तसे दाम या म्हणीनुसार न होते, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही या म्हणीनुसार झाले. सदर गैरप्रकारात रोहयो तांत्रिक पॅनल अभियंता व प्रथम पुरुष यांचा सिंहाचा वाटा असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.उपरोक्त कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आहे. त्याचबरोबर तलावाचे खोलीकरण काम सुरू झाल्यापासून कोणकोणत्या शेतकर्यांना किती ट्रॅक्टर माती देण्यात आली याची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी व गावकरी वामन राऊत, प्रभाकर गाढवे, मुकेश आगाशे, नितीन कारेमोरे, डुलीचंद साठवणे, प्रकाश डोरले, यादोराव बांते, दिनेश राऊत, दिलीप साठवणे, राजेश साठवणे, शांताबाई साठवणे, योगेश तितीरमारे, नंदकिशोर बुधे, गणेश ठवकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
रोजगार हमी योजना कामात गैरप्रकार
By admin | Updated: May 29, 2014 23:48 IST