भंडारा : शासनाकडून महा ई-सेवा केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात येणार्या युआयडी कीटमध्ये टाईल्सचे तुकडे आढळून आल्याचा गंभीर प्रकार धारगाव येथ उघडकीस आला. याप्रकरणी केंद्र संचालकाने भंडारा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.शासानाकडून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील ईच्छूक महा ई-सेवा केंद्रांना आधारकार्ड किट पुरविण्यात येते. त्यासाठी धारगावचे केंद्र संचालक प्रतिभा राजकुमार गिर्हेपुंजे यांनी युआयडी कीटसाठी महाऑनलाईनच्या बँक खात्यावर पैसे जमा केले. ही कीट जिल्हाधिकारी कार्यालयातून घेऊन जाण्यासाठी २७ मे रोजी दुपारी ३ वाजता गिर्हेपुंजे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले. गिर्हेपुंजे तिथे पोहोचल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रावर स्वाक्षरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक सुनिल भोले, महाऑनलाईनचे जिल्हा समन्वयक प्रविण बडगे व आशिष वानखेडे यांनी ही कीट त्यांच्या सुपूर्द केली. परंतु ही किट ना गिर्हेपुंजे यांनी तपासून पाहिली ना कर्मचार्यांनी तपासून दिली. त्याच बंद डब्ब्यातील किट घेऊन गिर्हेपुंजे परतले. त्यानंतर धारगाव येथे सर्वांच्या उपस्थित हे किट उघडण्यात आले असता लॅपटॉप बॉक्समध्ये टाईल्सचे तुकडे आणि दगड आढळून आले. यावेळी ओमप्रकाश गिर्हेपुंजे, माधव मस्के, सुहास गिर्हेपुंजे उपस्थित होते. त्यानंतर तातडीने संपर्क साधून हा प्रकार कीट देणारे कर्मचारी भोले यांना सांगण्यात आला. त्यांनी कार्यालयात बोलावून घेतले. परंतु त्यांचे समाधान करु शकले नाही. त्यानंतर हा प्रकार जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आणून दिला आहे. आता कोणाविरुद्ध कारवाई होते, ते कळेलच. (जिल्हा प्रतिनिधी)
युआयडी किटमध्ये ंआढळले दगड
By admin | Updated: May 30, 2014 23:27 IST