लाखांदूर तालुक्यात २५ तलाठी साझा व चार महसूल मंडळ आहेत. या महसूल मंडळात विरली बु , मासळ, बारव्हा व लाखांदूर आदी मंडळांचा समावेश आहे. गत काही दिवसांपासून तालुक्यातील चार महसूल मंडळापैकी दोन मंडळांच्या अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. केवळ २ मंडळ अधिकाऱ्यांवर संपूर्ण तालुक्यातील २५ तलाठी साझाच्या अंतर्गत ८९ गावांचा कारभार आला आहे. शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या विविध कामे पार पडताना विविध समस्यांचा सामना करावे लागत आहे. शासन नियमानुसार महसूल प्रशासन अंतर्गत वरिष्ठ लिपिकाला मंडळ अधिकाऱ्याचा पदभार सोपविला जाऊ शकतो. मात्र गत काही वर्षांपासून जिल्ह्यात या पदाच्या नियुक्ती संबंधाने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांना अधिकाऱ्यांविना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त दिसून येत आहेत. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन तालुक्यात रिक्त असलेल्या मंडळ अधिकारी यांचे पद भरण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.