पावसाने डोळे वटारले : शेतकरी आर्थिक संकटात, दुबार पेरणीचे संकट, व्यापारीही ग्राहकांच्या प्रतीक्षेतभंडारा : मृग नक्षत्रात पावसाची आशा दाखवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस मात्र नक्षत्र बदलताच गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झालेला दिसतो आहे. लहान मुले म्हणायचे ते गीत आता बळीराजा म्हणताना दिसतो. ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’, अशी आर्त हाक ऐकूनही पावसाला मात्र पाझर फुटताना दिसत नाही. अगोदरच चारही मुंड्या चित झालेला शेतकरी या पावसाच्या लहरीपणामुळे अगदी हतबल होताना दिसत आहे.सुरुवातीचे अंदाज सत्य होताहेत. त्यामुळे मृग नक्षत्रात पाणी यायची सुरुवात झाली. त्यामुळे यावर्षी पावसाळा खूप असेल, अशी आशा लागलेल्या बळीराजाची संपूर्ण निराशा झाली आहे. त्यांची सुरुवात अगदी वेळेवर झाल्याने आता संपूर्ण नक्षत्रात पाऊस राहील, या विश्वासात शेतात बियाणे लावायचे ठरविले. पण लहरी पावसाने मात्र बळीराजाचा विश्वासघात केला. सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी राजाला निसर्गही डोळे वर काढू देत नाही, याचे दु:ख वाटते. बळीराजाची प्रभात पावसाच्या प्रतीक्षेत सुरु होते आणि रात्रही प्रतीक्षेतच जाते. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. शेतात उगवत असलेली रोपे जगवायची कशी, मशागत करुन ठेवलेल्या शेतीवर बियाणे लावायचे कधी, दुबार पेरणीला पुन्हा पैसे आणायचे कुठून, संसारातील आर्थिक व्यवहार, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादी समस्या सोडवायच्या कशा, आदी प्रश्नात तो गुरफटून आहे. सदर प्रश्न कधी सुटणार याचा विचार सतत करीत आहे. (शहर प्रतिनिधी)खरबी परिसरात पऱ्हे सुकलेखरबी (नाका) : या परिसरामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून या परिसरामध्ये पेंच प्रकल्पाचे पाटबंधारे विभागाचे नहर आहे. पण पेंच प्रकल्पाने पाणी न सोडल्यामुळे शेती मधील पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे यावर्षी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावणार असल्याचे चित्र आहे.या परिसरात बहुतांश शेतकऱ्यांच्या धान व सोयाबीन या पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाण्याअभावी ६० टक्के पऱ्हे करपले असून एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर संपूर्ण पऱ्हे करपतील व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असे स्पष्ट दिसत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या परिसरात २५ टक्के शेती कृषीपंपावर ओलीत असून ७५ टक्के शेती ही पेंच प्रकल्पाच्या पावसावर अवलंबून आहे. (वार्ताहर)छत्री-रेनकोटला ग्राहकच नाहीपावसाळा सुरु होताच कपडा व्यवसायिकांनी छत्री, रेनकोटने आपली प्रतिष्ठाने भरली. लाखोंची खरेदी केली व विविध आकर्षक रंगाचे रेनकोट व छत्रीने दुकाने थाटली. मात्र यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे दुकानदार हवालदिल झाला आहे. रेनकोट छत्रीत लाखो रुपये गुंतविले. मात्र पाऊसच पडत नसेल तर छत्री व रेनकोट कोण, कशासाठी घेणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाजारात छत्री व रेनकोट खरेदी करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने व्यापाऱ्यांचा खरेदी केलेला माल यावर्षी शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुबार पेरणीचे संकटकुंभली : सध्या पावसाचा लपाछपीचा खेळ सुरु असून शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेला आहे. रोहिणी, मृग, आद्रा व आता तरणा पाऊस म्हणून समजला जाणारा पुनर्वसू नक्षत्र सुरु आहे. दररोज शेतकरी सकाळ झाली की आकाशाकडे टक लावून बघतो. परंतु दिवस कोरडाच जातो. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे.आधीच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती धानाचे भाव नसल्यामुळे बिकट आहे. पेरणीकरिता कशीतरी बियाण्यांची व्यवस्था केली. गेल्या फसलीत झालेले धान्य बियाण्यांकरिता वापरले. तसेच पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागला. त्यात दुबार पेरणीचे सावट शेतकऱ्यांवर असल्यामुळे बळीराजाला चिंतेत जास्तच भर पडत आहे. ज्यांच्याकडे मोटारपंपची सोय आहे त्यांची रोवणी कशीतरी सुरु आहेत. परंतु जी शेती वरथेंबी आहे त्या शेतकऱ्याला वरच्या पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याने काय करावे हा यक्ष प्रश्न आहे. दुबार पेरणी करण्याचा प्रसंग आल्यास बियाण्यांची व्यवस्था कशी करावी हा गंभीर प्रश्न आहे. (वार्ताहर)
पावसाने उडविली बळीराजाची झोप !
By admin | Updated: July 16, 2015 00:54 IST