डी.एस. गायकवाड : ग्रीन पॅराडाईस फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उपक्रम भंडारा : डाळींब लागवड करीत असताना शेतकऱ्यांनी जिद्द, कष्ट आणि अभ्यासवृत्ती बाळगणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन डी.एस. गायकवाड यांनी केले. ग्रीन पॅराडाईस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमीटेड व हरितवेल कृषी व ग्रामीण विकास बहु. संस्था भंडारा यांच्या वतीने आयोजित डाळींबाच्या शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. जिल्ह्यात डाळींब पिकाचा वाढता कल लक्षात घेता काही उत्सूक तसेच शेतीमध्ये आवड असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग व तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक विकास घडवून आणण्यास सुरुवात केली. याचे उदाहरण म्हणजे मागील तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी डाळींब शेतीची लागवड केली आहे. डाळींब शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास मिळणारा नफा देखील मोठा आहे. परंतु डाळींब मुख्यत: कोरड्या व कमीपावसाचे ठिकाणचे पीक असून जिल्ह्यातील हवामान पिकास पाहिजे तसे अनुकुल नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना डाळींब बागेमध्ये बहार, कीड व रोगाच्या व्यवस्थापन करण्यास अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्यात २५ ते ३० एक क्षेत्रावर डाळींब बागाची लागवड केली आहे. परंतु वर्षानुवर्ष फक्त भात पीक घेत असलेल्या शेतकऱ्यांना डाळींब उत्पादनाविषयी तांत्रिक ज्ञान व योग्य माहिती उपलब्ध नसल्याने उभारलेल्या बागेमधून पाहिजे तसा नफा मिळत नाही. डाळींब लागवड केलेल्या शेतकऱ्यांना डाळींब उत्पादनाविषयी तांत्रिक माहिती उपलब्ध होेण्याचे उद्देशाने ग्रीन पॅराडाईस फॉर्मन प्रोड्युसर कंपनी लिमीटेड व हरितवेल कृषी व ग्रामीण विकास संस्था समृद्धीनगर, भंडारा यांच्या वतीने कंपनीच्या प्रशिक्षण सभागृहात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आसावरी पात्रीकर, डॉ.गिरीश निखाडे, उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड, तात्रिक तंत्र व्यवस्थापक अपेक्षा बोरकर आदी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात डाळींब पिकाविषयी मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांना लागवडीचे यशस्वी मंत्र सांगताना यामध्ये लागवड तंत्रज्ञान करीत योग्य जमीन तयार करणे, जलव्यवस्थापन, हवामान रोप (वाण), डाळींब लागवडीपासून तर फळ धारणा होवून काढणीपर्यंत लागणारे अन्नद्रव्य, खताचे व्यवस्थापन, एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन दोन झाडातील अंतर झाडाला आकार देण्याची पद्धत, छाटणी बागेला ताण देवून यशस्वी भारधानेसाठी तांत्रिक बाबीची माहिती, बहार व्यवस्थापन, फळ तोंडणी तसेच विक्री व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करून डाळींब उत्पादनाच्या यशस्वी मुलमंत्र मंडळ कृषी अधिकारी साकोलीचे डी.एस. गायकवाड यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांचे पिकाबाबत मत जाणून चर्चासत्राद्वारे त्याच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. त्याचबरोबर कंपनीच्या संचालक आसावरी पात्रीकर यांनी कंपनी स्थापनेचे उद्देश शेतकऱ्यांना गरजेनुसार योग्य मार्गदर्शन व मालाच्या प्रतवारीनुसार योग्य बाजारपेठ उपलब्ध करून घेणे आहे आणि पुढे सीताफळ व अॅपल बोर याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्याचे कंपनीचे निर्णय असल्याचे सांगितले. डॉ.गिरीश निखाडे यांनी, आधुनिक शेतीकरीत असताना जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रीय श्ेतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर पात्रीकर यांनी आधुनिक शेती करीत असताना शेतकऱ्यांनी वेळोवेळी नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञानार्जन करावे असे मत व्यक्त केले. या प्रशिक्षण वर्गामध्ये डाळींब लागवड केलेले तसेच नव्याने डाळींब लागवड करण्यास इच्छुक शेतकरी सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्राचे संचालन नितीश किरणापुरे यांनी केले. तर प्रास्ताविक आसावरी पात्रीकर यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ.गिरीश निखाडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
डाळींब लागवडीसाठी जिद्द आवश्यक
By admin | Updated: December 26, 2016 00:58 IST