साकोली : ग्रामभेट या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी साकोली तालुक्यातील अतिदुर्गम पिटेझरी या आदिवासी बहुल गावाला भेट दिली.यावेळी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुकास्तरीय अधिकारी, ग्राम स्तरीय कर्मचारी व ग्रामस्थांची एकत्रीत बैठक घेतली. यात त्यांनी गावक-यांना स्वतंत्र ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, भारनियमन बंद करने, रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच गावात बँकीग सुविधा देणे, या समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनील बन्सोड, साकोलीचे उपविभागीय अधिकारी तलमले, तहसीलदार डॉ. हंसा मोहणे, खंडविकास अधिकारी बोरकर, जिल्हा क्रिडा अधिकारी गांगरेड्डीवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साबळे, सरपंच कांता कापगते उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मोकळेपणाचे बोलण्यासाठी प्रोत्साहित केले. ग्रामस्थांनी पिटेझरी हे गाव गटग्रामपंचायतमध्ये येते, गावाची लोकसंख्या ६५० असल्याने गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. जिल्हाधिका-यांनी ग्रामस्थांचा या मागणीला दुजोरा देत बीडीओना प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तात्काळ पाठविण्याचे आदेश दिले. गावातील तलाव खोलीकरण, दुरुस्ती आणि कालव्याची दुरुस्ती या मागणीला जिल्हाधिका-यांनी विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत २०१४-१५ या वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. इको डेव्हलपमेंट समीतीने गावाचा सुक्ष्म विकास आराखडा तयार केला असुन तो प्रत्येक विभागाला पाठविला असल्याची माहिती दिली. यासाठी सर्व विभागांनी त्यांच्याशी संबंधित कामे तात्काळ करावीत असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय वनहक्क पट््ट्यांचे प्रस्ताव दहा दिवसात उपविभागीय अधिका-यांकडे पाठवावे.गावातील पाणी पुरवठा टाकीची दुरुस्ती जनावरांना चराईसाठी कुराणाकरिता जागा, अतिवृष्टिमध्ये पडलेली घरे, इंदिरा आवास योजनेत बांधून देण्यात येतील. गावात प्रत्येक घरी शौचालयाचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात येईल. गावात बँकीग सेवा सुरु करण्यासाठी मिनी एटीएम सुरु करणे, नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून प्रस्ताव तयार करण्यात येईल. गावात व्यायामशाळा व वाचनालय सुरु करण्यात येईल, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले. यावेळी सरपंच कांता कापगते, उपविभागीय अधिकारी तलमले यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांनी राजस्व अभियानाची माहिती ग्रामस्थांना दिली व येत्या आठवड्यात मंडळस्तरावर समाधान शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
वनहक्कांचे प्रश्न निकाली काढणार
By admin | Updated: September 1, 2014 23:21 IST