पालांदूर (चौ.) : कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असताना शेतीही त्याला अपवाद कशी ठरणार. शेतमालाचे त्यातही भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला. अशातच मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी मिरची शेतातच पिकू देऊन लाल मिरचीचे उत्पन्न घेणे सुरू केले. त्यामुळे या संकटात शेतकऱ्यांना लाल मिरचीने चांगलीच साथ दिल्याचे पालांदूर परिसरात दिसत आहे.
दरवर्षी शेतकरी आपल्या सोयीने बाजारपेठेचा अभ्यास करून पीक घेतात. प्रचंड परिश्रम घेऊन शेतात लागवड करतात. मात्र नैसर्गिक प्रकोप शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेला असतो. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षीही तसेच कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत आहे. तालुकास्तरावरच्या बाजारपेठा प्रभावित झाल्या आहेत. भाजीपाला बाहेर जाणे थांबले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गडगडले. नाईलाजाने शेतकऱ्यांना दोन ते चार रुपये किलोने वांगे, टोमॅटो विकावे लागले. पानकोबी, फुलकोबीचा गड्डा तर एक रुपयाला विकण्याची वेळ आली. अशा स्थितीत पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना लाल मिरचीने साथ दिली. ३० रुपये किलो असलेला दर १५ रुपये किलोपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी शेतातील मिरची न तोडण्याचा निर्णय केला. मिरची लाल पिकविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला.
साडेतीन किलो हिरव्या मिरचीचे एक किलो लाल मिरचीएवढे वजन भरते. लाल मिरचीचे दर सध्या १४० रुपये प्रती किलो आहे. लाल मिरचीचा हंगाम सुरू झालेला आहे. अनेक जण मिरची खरेदी करून ठेवतात. त्यामुळे लाल मिरचीला मागणी आहे. आजच्या दराचा विचार केल्यास शेतकऱ्यांना यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. लाल मिरची विकली गेली नाही तर शीतगृहात नागपूरला ठेवण्याची सोय आहे असे प्रगतीशील शेतकरी अरुण पडोळे यांनी सांगितले.
बाॅक्स
कसारी मिरचीचे भाव गगनाला
कसारी अर्थात बोट मिरचीचे भाव गगनाला भिडले आहे. २३० ते २५० रुपये एवढा दर मिळत आहे. चुलबंद खोऱ्यात पालांदूर परिसरात या मिरचीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. शहरी भागात या मिरचीला मागणी असल्याची माहिती मिरची सातराचे व्यवस्थापक सुखदेव हटवार यांनी सांगितले.
बाॅक्स
महिला मजुरांना मिळाले काम
मिरची तोडण्यासाठी महिला मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे परिसरातील शेकडो हातांना काम मिळाले आहे. परिसरात मिरचीचे लालचुटूक सातरे सजले आहेत. दररोज या मिरचीवर लक्ष देण्यासाठी शेतकरी खपत आहे. आतापासून पाच किलो, दहा किलो मिरचीची मागणी सुरू झाली आहे. किमान पाच ते सात क्विंटल मिरची स्थानिक ग्राहकांना विकली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाचणार असून ग्राहकांनाही ती कमी किमतीत मिळेल. पालांदुरलासुद्धा लाल मिरचीचा मोठा बाजार भरतो. सध्या पालांदूर परिसरात मिरचीला चांगली मागणी असून मजुरांनाही काम मिळाल्याने कोरोना काळात चांगलाच दिलासा मिळत आहे.