पदे अतिरिक्त : ४० हजार प्रयोगशाळा कर्मचारीसाकोली : न्यायालयात प्र्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयातील संच मान्यता देताना प्रयोगशाळा हे पद अतिरिक्त दाखविले. त्यामुळे राज्यातील ४० हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशत:, पूर्णत: अनुदानीत माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध सादर करताना प्रयोगशाळा परिचर हे पद रद्द करण्यात आले.राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळा परिचर अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. आज विज्ञान युगात विद्यार्थ्यांना तांत्रीक व विज्ञानाची परिपूर्ण माहिती प्रयोगांच्या माध्यमातून मिळत असताना प्रयोगशाळा परिचर हे पद रद्द करून एक प्रकारचा अन्याय करण्यात आला आहे. शाळांची संच मान्यता देताना प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्याचा प्रकर अनेक जिल्ह्यात सुरु आहे. प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. उच्च न्यायालयाने या आकृतीबंधाचा स्थगनादेश दिला आहे. तरी देखील या कर्मचाऱ्यांचे आॅफलाईन वेतन काढण्याची कारवाई सुरु केल्याचे समजते. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरवून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाची तयारी संघटनेने केली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांची शनिवारी लाखनी येथे बैठक पार पडली. (तालुका प्रतिनिधी)
प्रयोगशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Updated: November 16, 2014 22:45 IST