पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील बाम्हणी येथे १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी जलप्राधिकरण योजना प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षापासून धुळखात उभी आहे. यामुळे अनेक गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. संबंधित विभागाने याकडे त्वरीत लक्ष देण्यात यावे अशी मागणी उपसरपंच द्रोपद धारगावे यांनी केली आहे.ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला शुद्ध पाणी मिळावे, प्रत्येक पाणी टंचाईपासून मुक्त व्हावे याकरिता प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून ही नळयोजना उभी करण्यात आली. यात वैनगंगा नदीतून थेट पाणी येथे जमा केले जाते. याकरिता इटगाव ते बाम्हणीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेचे पाणी कोंढा, कोसरा, आकोट, चिचाळ, वासेळा, वलनी, शिवनाळा, खैरी, भेंडाळा आदी गावांना पाणी पुरवठा करायचा होता. मात्र ज्या गावात ही योजना आहे त्याच गावाला या योजनेचे पाणी मिळणार नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नााराजी व्यक्त केली जात आहे. या नळयोजनेमध्ये काम दोन वर्षापूर्वीच झाले आहे. मात्र या योजनेची मुख्य पाईप लाईन निकृष्ट दर्जाची टाकली गेल्यामुळे जागोजागी लिकेज सुरु झाला आहे. एवढ्या कमी वेळात पाईप लाईन फुटणे म्हणजे ते किती पट चांगली आहे या बाबत न बोलले बरे. कंत्राटदाराकडून लिकेज झालेली पाईप लाईन सुरळीत करण्याकरिता एक वर्ष लागला. मात्र काम पूर्ण होऊ शकले नाही. अखेर कंत्राटदाराने काम बंद केले. आता ही नळयोजना केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. (वार्ताहर)
नळयोजना धूळ खात
By admin | Updated: September 3, 2014 23:08 IST