पवनी : शिधापत्रिकेसंदर्भात वारंवार तक्रार करूनही समस्या न सुटल्याने अखेर जिल्हा परिषद सदस्या हंसा खोब्रागडे यांनी पवनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.आज उपोषणाचा पहिल्या दिवशी कुठल्याही अधिकाऱ्याने मंडपाला भेट दिली नाही. या संदर्भात संबंधित विभागाला आंदोलनासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. पवनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप आहे. या विभागात जवळपास दोन वर्षांपासून शिधापत्रिकेसंबंधी अनेक प्रकरणे निकालात काढण्यात आली नाही. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही. याची तक्रार या लाभार्थ्यांनी या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य हंसा खोब्रागडे यांच्याकडे केली होती. खोब्रागडे यांनी याची दखल घेत पवनीचे तहसीलदार यांचेशी भेट घेत प्रकरण मार्गी लावण्यासंबंधी चर्चा केली होती. त्या अंतर्गत दि. २२ जून पर्यंत प्रकरणे मार्गी न लागल्यास दि. २४ जून पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.तत्कालीन तहसीलदारांनीही यासंबंधी विशेष कारवाई केली नव्हती. लाभार्थ्यांना लाभ न मिळाल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. शिधापत्रिकाच्या कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. याशिवाय गहाळ झालेल्या अर्जांची प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. तसेच शिधापत्रिकाच्या कामाकरीता १०० रुपयाच्या मुद्रांकावर अर्ज करण्याबाबत कार्यालयातच संभ्रम आहे. तहसील कार्यालयातून जातीचे प्रमाणपत्र, क्रिमिलेअर, स्थलांतरण प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठीही हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आज उपोषणाला प्रारंभ होताच पवनी तालुक्यातील विविध गावातून लाभार्थी उपोषण मंडपी गोळा झाले होते. तसेच पुरवठा कार्यालयातही या लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र पुरवठा विभागातील कारकून सुटीवर असल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. तहसीलदारही कामानिमित्त बाहेर असल्याने मागण्यांसंदर्भात तोडगा निघू शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)
पवनीत आमरण उपोषण सुरू
By admin | Updated: June 25, 2014 00:15 IST