कौन बनेगा सरपंच?तीर्थाटन व पैशाच्या सेटिंगची चर्चायुवराज गोमासे करडी (पालोरा)गाव विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नुकत्याच गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात आणि कही खुशी कही गमचे वातावरण दृष्टीस पडले. आता ४ व ६ आॅगस्ट रोजी सरपंच पदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कौन बनेगा सरपंच यावर सट्टाबाजार गरम झालेला असून अनेक गावचे नवनियुक्त सदस्य गावातून दिसेनासे झाले आहेत. काही तिर्थाटन तर काही पैशाच्या सेटींगसाठी चर्चेत आहेत. समर्थकांनी त्यासाठी सर्वकाही करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. पंचायत राज अभियानांतर्गत सध्या ग्रामपंचायतींना विविध अधिकार शासनाने प्रदान केलेले आहेत. गावाच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामप्रतिनिधींकडे सोपविण्यात आलेली आहे. शासनाच्या विविध योजना व थेट निधीही दिला जात आहे. विकास कामांचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेखीबरोबर पैशाचा विनियोग करण्याचे अधिकार प्रदान झाल्यानेच वरिष्ठ पुढाऱ्यांचे लक्ष सुद्धा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनी वेधून घेतले आहे. पुढाऱ्यांची जननी म्हणून ग्रामपंचयातींना ओळखले जाते ते या समीकरणांमुळेच. त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपले व आपल्याच समर्थकांचे अधिराज्य असावे या मानसिकतेतूनच गावाच्या निवडणुकात पैशासारखा पैसा खर्च झाला. विविध कामे मिळावीत म्हणून काही कंत्राटदारांनी अनेक उमेदवारांचा खर्च स्वखिशातून केला. आता सरपंचही आपल्याच मर्जीतला, जवळचा, मित्र, नातेवाईक असावा यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गावातीलच नव्हे तर बाहेर गावातील राजकीय मंडळींना हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. कोण, कुठे, केव्हा, कुणाचे घरी जातो याची तपशिलवार माहिती ठेवली जात आहे. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने घोडेबाजार वधारला आहे. जिथे कमी सदस्य निवडून आले तिथे इतरांच्या मदतीसाठी साम, दाम, दंड, भेद आदी नीती अवनीतीचा वापर सुरु आहे. आपणच सरपंच होणार म्हणून काहींनी तर देवाला नवस फेडण्याच्या नावाखाली कोंबडे व बकऱ्यांच्या ओल्या पार्ट्या सुद्धा दिल्या व देण्याचे कबुलही केले आहे. हा सर्व उपद्व्याप फक्त खुर्चीसाठी केला जात आहे. सरपंच पदाची लालसा नवनियुक्तांना स्वस्थ बसू देत नाही व झोपूही देत नाही. घरचे मंडळी यामुळे कमालीचे त्रस्त आहेत. पळवापळवीचे राजकारण शिगेला पोहचले असून कुठे तिर्थाटन तर कुठे पैशाच्या बळावर सेटींग झाल्याच्या चर्चा आहेत. सरपंचपदासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असून वेळ पडल्यास जमीन विकण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही असा दम समर्थकांकडून व्यक्त होत आहे. कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१४८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवडणूकजिल्ह्यात १४८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक २५ जुलैला ोण्यात आली. जवळपास २ हजार ६१४ उमेदवारांच्या नशिबाचा फैसला २७ जुलैला झाला. दि. ४ व ६ आॅगस्ट रोजी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रिया होणार आहेत. प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी चालविली आहे.
खेड्यापाड्यात पळवापळवीचे राजकारण
By admin | Updated: August 4, 2015 00:31 IST