आरोग्य सुविधांचा अभाव : नऊ विद्यार्थी भंडाऱ्यात दाखलभंडारा : लाखनी तालुक्यातील आडवळणावर असलेल्या निमगाव येथे मागील १० दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. नऊ विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक हजार लोकसंख्या असलेल्या निमगाव येथे आरोग्य सुविधांचा अभाव आहे. मागील १० दिवसांपासून या गावात डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. दुसरी ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आजाराची लागण झाली आहे. मात्र गावातील अशिक्षितपणामुळे पालकवर्ग गावठी उपचार करण्यावर भर देत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात त्रास झाल्याने त्यांना लाखनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये प्रणाली चौधरी, प्रांजली चौधरी, प्रगती चौधरी, स्वप्नील तिवाडे, शेषपाल भोयर, काजल सेलोटे, दिव्या तिवाडे, वंशिका तिवाडे, देविदास चौधरी यांचा समावेश आहे. आणखी काही विद्यार्थ्यांना याची लागण झाली असून त्यांच्यावरही पालकवर्ग गावठी उपचार करीत आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डमदेव कहालकर यांनी शिवतिर्थ मानव कल्याणकारी संस्था व जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. मात्र अशिक्षित पालकवर्ग असल्याने अडचणी येत आहे. गावात आणखी काही विद्यार्थ्यांना आजाराने कवेत घेतले असून आरोग्य विभागाने याची दखल घेऊन गावात आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी सरपंच संगिता चौधरी यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)
निमगावात डेंग्यूची साथ
By admin | Updated: August 25, 2014 23:47 IST