टीव्हीसाठी शिक्षकांची भटकंती : विद्यार्थी संभाषणापासून वंचित राहण्याची शक्यताभंडारा : शिक्षक दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भाषणातून विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण संदेश देणार आहे. यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व शाळांना पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यात येणार आहे. या आशयाचे राज्य शासनाचेही पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र अनेक शाळांमध्ये वीज असूनही टिव्ही नाही आणि संगणक असूनही इंटरनेट सुविधा नसल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरच्या शाळामधील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी दूरदर्शन, इंटरनेट, रेडीओ आदी साधने उपलब्ध करून देण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत.जिल्ह्यात हायस्कुल, जिल्हा परिषद, खासगी, प्राथमिक शाळांची संख्या भंडारा तालुक्यात २५६, मोहाडी १५८, लाखांदूर १३९, साकोली १५६, तुमसर २५७, पवनी १९६ व लाखनी १५४ अशा १ हजार ३१६ शाळा जिल्ह्यात आहेत. या शाळांमध्ये २ लाख २५ हजार २८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. जिल्ह्यातील १ हजार २४६ शाळांना टीव्ही पुरवठा करण्यात आले असून त्यातून १ लाख ९५ हजार ११८ विद्यार्थी मोंदींचे भाषण थेट बघणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार ३०३ शाळेत विद्युत जोडणी झालेली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत १६५ शाळांना संगणक पुरवठा करण्यात आले आहे. सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना टीव्हीवरून थेट भाषण ऐकण्याची सुविधा असून, उर्वरित ५० हजारांवर विद्यार्थी थेट भाषण ऐकण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थी भाषण ऐकण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मुख्याध्यापक, शिक्षण समिती व शिक्षण विभाग धावपळ करीत आहे. ज्या शाळेत विद्युत जोडणी नाही, अशा शाळांमधील विद्यार्थी भाषण ऐकण्यापासून वंचित राहू नये म्हणून जनरेटरची व्यवस्था करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. त्यामुळे त्याचा खर्च कोणी उचलावा, याबाबत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन कमिटी द्विधा मन:स्थितीत आहे. ज्या शाळांमध्ये विद्युत पुरवठा आहे, मात्र टीव्ही नाही अशा शाळांना ग्रामपंचायतीने किंवा गावातील प्रमुख व्यक्तीकडून टीव्ही उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश आहेत. पंतप्रधान मोदी भाषणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हा संवाद प्रोजेक्टरवर किंवा इंटरनेटच्या माध्यमातून साधणार आहेत. मात्र ग्रामीण भागात या सुविधांचा अभाव असल्याने पंतप्रधानांच्या संवादापासून हे विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्र्यांच्या संवादाचा लाभ केवळ शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणार असण्याची शक्यता असून त्यातही किती शाळेतील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधेल याबाबत उत्सुकता आहे. (शहर प्रतिनिधी)
मोदींच्या संदेशासाठी शिक्षण विभागाची धावपळ
By admin | Updated: September 3, 2014 23:07 IST