मोहाडी : विज विभागाच्या दुर्लक्षामुळे व कामचुकार प्रणालीमुळे मोहाडी व आजूबाजूच्या परिसरातील गावात दररोज विजेच्या समस्याने नागरिक हैरान झालेले आहेत. दररोज विजेचा लपंडाव दिवसभर सुरू असतो. अनेक वेळा तक्रार करूनही या समस्येकडे लक्ष देण्यासाठी विज विभागाच्या अधिकार्यांकडे वेळ नाही. मात्र यामुळे भर उन्हाळ्यात येथील नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत. मोहाडीत महावितरण कंपनीचा उपविभागीय कार्यालय आहे. शाखा अभियंताही आहे. पावरहाऊसही आहे तरी वीज समस्या जशाची तशीच आहे. दिवसातून अनेकवेळा वेज चालूबंद होण्याचा प्रकार जवळपास एक महिन्यापासून सुरू आहे. विज वितरण कंपनी ग्राहकांकडून विज शुल्कासह अनेक प्रकारचे शुल्क उकळते. विज बिल भरण्यास थोडाही उशीर झाला तर विज कनेक्शन कापले जाते. विजेचा बिल वसूल करण्यासाठी जेवढी तत्परता दाखविली जाते तेवढी तत्परता विज समस्या दूर करण्यासाठी दाखविली जात नाही. गावातील अनेक डी.पी. मोडकळीस आलेले आहेत. त्यांना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. विद्युत तार जुन्या झालेल्या आहेत. त्यांना बदलविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे थोडासा जोराचा वारा जरी आला तर लोंबकळलेल्या विद्युत तारा एकमेकांना स्पर्श करतात व विज बंद होते. थोडासा ही पाऊस आला तर डीपी वरील फ्यूज उडतो व वीज बंद होते. मात्र या समस्यांना सोडविण्यासाठी विज वितरण कंपनी कडून कोणताही प्रयत्न केला जात नाही.गावातील व गावाबाहेर गेलेली विद्युत वाहिनीचे तार फार जुने असल्याने तसेच विद्युत भार वाढविण्यासाठी लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर हे सुद्धा जुने असल्याने किंवा क्षमतेपेक्षा जास्त विज भार देण्यात येत असल्याने प्रत्येक घरात २४० व्होल्ट विज भार मिळण्याऐवजी फक्त १२० ते १४० व्होल्ट लोड राहतो. त्यामुळे १०० वॉटचा बल्ब २५ वॉटच्यासारखा उजेड देतो. तसेच टीव्ही, फ्रीज, कुलर, कॉम्प्युटर यांना उपयुक्त विजभार मिळत नसल्याने त्यांच्यात वारंवार बिघाड येतो. विज ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो.विज वितरण कंपनीकडूून विज ग्राहकांची वारंवार अवहेलना करण्यात येते. हा विज ग्राहकांशी एक प्रकारचा विश्वासघात असून सुद्धा महावितरण कंपनीवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. नियमित वीज पुरवठा, सदोष वीज पुरवठा प्राप्त करुन घेणे हा विज ग्राहकांचा अधिकार आहे. मात्र विजेची समस्याा घेऊन जाणार्या विज ग्राहकांनाच वीज कर्मचारी किंवा अधिकारी कडूून खरीखोटी ऐकविली जाते. (शहर प्रतिनिधी)
विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त
By admin | Updated: May 10, 2014 00:02 IST