गोबरवाही : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र शासनाचे मंत्री करीत असले तरी हा दावा पुर्ण झाले हे म्हणणे चुकीचे आहे. तुमसर तालुक्यातील गुढरी खुर्द गावामध्ये सन १९७४ मध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत एक शासकीय तलावाचे निर्माण केला. परंतु ४0 वर्ष लोटूनही या तलावाच्या नहराचे बांधकाम अर्धवट पडले आहेत. तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकर्यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही.ही खरी शोकांतिका आहे.शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनाकरिता दिले जात आहे. त्यामुळे शासनाला राजस्व प्राप्त होतो. शेतकर्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धानाचे पीक नष्ट होऊन नुकसान सहन करावा लागतो. सन १९८0 मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्यपूर्णझाले आहेत. जवळील मध्य प्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये याच प्रकल्पाचे नहरे व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरूआहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्यअजूनही अर्धवट पडलेले आहे.जे नहरे बनली आहेत तेही आता क्षतिग्रस्त झाले. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे. तुमसर तालुक्यातील सितेकसा गावामध्ये प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावांचे पुनर्वसन झाले आहे. राजीव सागर प्रकल्पातील लेंडेझरी, आलेसूर, रोंधा, मंगरली, पांगडी, सितासावंगी, राजापूर, चिखला, गोबरवाही, हेटीटोला, येदरबुची, पवनारखारी, गणेशपूर, सुंदरटोला, खंदाळ, गुढरी, धामनेवाडा, सोदेपूर आदी गावे ही प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत. सर्व गावाकरीता सिंचन सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून लिफ्ट ईरिगेशनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु बावनथडी प्रकल्पामध्ये एक ही लिफ्ट योजनेचे निर्माण केले नाही ही शोकांतिका आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकर्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीला सिंचनाची आवश्यकता आहे. (वार्ताहर)
तलाव असूनही सिंचनाचा अभाव
By admin | Updated: May 8, 2014 01:31 IST