भंडारा : राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी हात दाखवा, बस थांबवा ही योजना सुरु केली. परंतु चालकाच्या मनमानीमुळे ही योजना कागदावरच आहे. हात दाखविल्यानंतर अनेक बसेस थांबत नाही, अशी प्रवाशांची ओरड आहे.प्रवासी हेच दैवत आहे, असे मानणार्या एस.टी. महामंडळाने हात दाखवा बस थांबवा ही योजना मोठय़ा गाजावाजाने सुरु केली. परंतु या योजनेला चालक - वाहक प्रतिसाद देत नसल्याने ही योजना कागदोपत्रीच रखडत आहे. या योजनेअंतर्गत बस थांब्याऐवजी दोन चार प्रवासी असेल तर बस थांबविण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहे. परंतु प्रवासी बसथांब्यावर पोहचण्यापूर्वीच बस आलीच व थोड्या अंतरावर असलेल्या प्रवाशांनी हात दाखविला तर चालक बस थांब्याऐवजी भरधाव वेगाने बस पुढे नेतो. परंतु बस थांबविण्याचेही साधे सौजन्यही दाखवित नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी ही योजना मृगजळ ठरत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. यानिमित्त प्रवास करणार्यांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक सोयीस्कर आणि कमी खर्चाचा प्रवास आणि सुरक्षितता या सर्व दृष्टीने एस.टी. महामंडळाला प्रवाशांची पहिली पसंती आहे. असे असले तरी एस.टी. बसेसला हात दाखविण्यातच बराच वेळ निघून जातो. हा प्रकार ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नित्याचाच झाला आहे. या कारणाने नाईलाजास्तव धोक्यात जीव घालून ग्रामस्थांना अवैधरित्या प्रवास करावा लागतो. काही जण जीव धोक्यात घालून प्रवास करण्याच्या भानगडीत पडत नसल्यामुळे ते मुकाट्याने गावाला न जाता वेळ निघून गेल्यामुळे घराकडे परत जाणे पसंत करतात. शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी पास काढतात. मात्र त्यांनाच एस.टी.चा फटका सहन करावा लागतो. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष वेधून शासकीय योजनेचा प्रवाशांना लाभ मिळवून देण्याची मागणी ग्रामीण प्रवाशांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)
‘हात दाखवा-बस थांबवा’ नावापुरतेच
By admin | Updated: May 29, 2014 23:47 IST