एका रानडुकराचा मृत्यू
पालांदूर : लाखनी तालुक्यातील नरव्हा (लोहारा) येथे तोंडी नसलेल्या एका विहिरीत कळपातील आठ रानटी डुुकरे पडले. ग्रामस्थ आणि वन विभागाच्या प्रयत्नाने या आठही डुकरांना विहिरीबाहेर काढण्यात आले. दरम्यान, एक डुकराचा गुदमरुन मृत्यू झाला. या सातही रानडुकरांना किटाडी जंगलात सोडण्यात आले. नरव्हा गाव चुलबंध नदी काठावर असून या परिसरात पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे वर्षभर पिके घेतली जातात. सुमित्रा कांबळे यांच्या शेतात वापरात नसलेली पांढर्या दगडांची विहीर आहे. ही विहीर झुडुपात असून विहीरीला तोंडी नाही. झुडपाच्या आश्रयाला जाण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ आठही रानडुकरे विहिरीत पडली. विहिर रस्त्याला लागून असल्यामुळे ते नागरिकांच्या लक्षात आले. परंतु, विहीरीतील रानडुकरांना बाहेर काढणे जिकरीचे होते. गावकर्यांनी ही माहिती वन विभागाला देताच अड्याळचे वनक्षेत्राधिकारी महेश पाठक, वनक्षेत्राधिकारी डुडे, क्षेत्रसहायक तरोणे, बीटरक्षक भुरे, भुजाडे पोहोचून रात्रभर पहारा देत राहिले. सकाळी या रानडुकरांना काढण्याचे काम सुरू झाले. तोंडी नसलेल्या विहिरीभोवती वाढलेली झुडपे, २० फूट लांब व रुंद असलेली ही विहीर १५ फूट खोल आहे. तिथून या वजनदार प्राण्यांना बाहेर काढणे जिकरीचे झाले होते. अनेक युक्त्या आखत जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांच्या सहकार्याने जेसीबी मागण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने पहिले २० फूट रस्ता विहिरीपर्यंत करण्यात आला. त्यानंतर परिसर स्वच्छ करुन जाळाच्या सहाय्याने रानडुकरांना बाहेर काढण्यात आले. सातही रानडुकरांना किटाडी वनक्षेत्रात सोडण्यात आले. एका रानडुकराचा गुदमरुन मृत्यू झाला. अड्याळ वनकार्यालयात अंत्यसंस्कार करण्यात आले. रानडुकरांना पाहण्यासाठी पाथरी, नरव्हा, लोहारा, पालांदूर येथील नागरिकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर) नरव्हा येथील विना कठड्याच्या विहिरीत रानडुकरे अशी पडली होती.