भंडारा : भंडारा शहरातील स्वच्छतेची जबाबदारी भंडारा नगर परिषदेकडे आहे, असा शहरातील नागरिकांचा सर्वसामान्य समज आहे. हा समज नगरपरिषदेने स्वत: खरा ठरविलेला आहे. या बाबीचे प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे असेल तर प्रभाग क्रमांक २ लाला लजपतराय वॉर्ड, संताजी जगनाडे मंदीरासमोर असलेल्या रस्त्यावरील नालीवर दृष्टी टाकली तर प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. संपूर्णनालीवर झुडूपांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे नाली दिसेनाशी झाली. संपूर्णनाली झुडूपांनी आच्छादलेली आहे. त्या झुडूपांनी भंडारा शहरातील बालोद्यानची कमी पूर्ण केलेली आहे. सदर रस्त्यावरून गेल्यावर नागरिकांना बालोद्यान मधील हिरव्यागार झुडूपातून फिरल्याचा आभास होतो. कदाचित याच कारणास्तव नगर परिषद झुडूपांची कटाई, सफाई करत नसावी. त्यामुळे नगर परिषद एकाच तीरात दोन निशान साधत आहे. त्यातील पहिला निशान नगरपरिषद स्वच्छतेवरील खर्च कमी करीत आहे. दुसरा निशान बालोद्यान नसताना बालोद्यान असल्याचे भासवित आहे.एका प्रभागात चार नगरपरिषद सदस्य असतात. यावरून नागरिकांच्या असे लक्षात येते की चार सदस्य प्रभागमध्ये येवून नागरिकांच्या किती समस्या जाणून घेतात. कदाचित पुढील नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच सदर झुडूपांची सफाई केली जाईल. झुडूप वाढल्यामुळे व नालीची सफाई न केल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. चार दिवसांपूर्वी सदर परिसरातील एका नागरिकाचा यामुळे मृत्यू झालेला आहे. परिसरातील नागरिक आता म्हणू लागले आहेत की नगर परिषदेने झोपेचे सोंग घेतलेले आहे. झोपलेल्याला उठवता येते. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. भंडारा शहरात नगर परिषद अस्तित्वात नसावी, असे एका नागरिकाने आपले नाव न सांगणाच्या अटीवर म्हटले आहे. नालीवरील झुडूपांची सफाई करून नाली बंदीस्त करण्यात यावी, अशी रास्त अपेक्षा नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)
नाली गेली झुडूपात, पालिकेचे दुर्लक्ष
By admin | Updated: May 8, 2014 01:32 IST