प्रशांत देसाई - भंडाराविघ्नहर्ता, गणराया, गजानन, गणेश, गणपती असे एक ना अनेक नावे धारण केलेल्या गणपतीचा उत्सव गणेशचतूर्थीपासून सुरू झाला आहे. गणेशपुरातील सन्मित्र गणेश मंडळाने यावर्षी नागपूरच्या टेकडीच्या गणेशाची प्रतिकृती उभारली आहे. त्यामुळे गावाच्या नावातच गणेश असलेल्या गणेशपुरात टेकडीचा गणपती अवतरल्याने त्याच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची रिघ लागत आहे.तारणहार म्हणून प्रसिध्द असलेल्या गणेशाची मोठ्या भक्तीभावाने त्याची प्रतिष्ठापणा केली जाते. दरवर्षी गणरायाचे विविधांगी रूपांच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापणा करण्याचा मान गणेशपुरातील सन्मित्र गणेश मंडाला आहे. गणेशोत्सवादरम्यान गणरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची पावले आपोआपच गणेशपुरकडे वळतात. लाखोंचा खर्च या गणेशोत्सवावर करण्यात येतो. मात्र यासाठी नागरिकांकडून एकही रूपयाची देणगी घेतल्या जात नाही. मंडळाचे सदस्यच वर्गणी गोळा करतात. यात काही उत्साही गणेशभक्त स्व:खुशीने मंडळाला देणगी किंवा साहित्याचे दान करून आपली भक्ती व्यक्त करतात.यावर्षी येथील गणेश मंडळाने नागपूर येथील टेकडीच्या गणपतीची प्रतिकृती साकारली आहे. ग्रामपंचायतीच्या मार्गावरील गावातील मुख्य चौकात या गणपतीची प्रतिष्ठापणा केली आहे. नागपूरचे पाटील नामक मुर्तीकराने ही गणेशमूर्ती साकारली आहे. मुख्य चौकातून जात असताना या गणेशाचे दर्शन होते. गणेश मंडळाचे अध्यक्ष राजकुमार मेश्राम असून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाब साटोणे, सचिव संजय भांडारकर, सहसचिव विनोद भुरे, कोषाध्यक्ष मनोज साठवणे यांच्यासह व्यवस्थापकाची भुमिका पार पाडणारे कमलेश मेहर यांच्यासह शेकडो गणेशभक्त सर्वोतोपरी मदत करून गणरायाची नित्यनेमाने स्तुतीस्तवन करून गणेशोत्सव साजरा करण्यात मग्न आहेत.या मंडळाचे हे २१ वे गणेशोत्सवाचे वर्ष आहे. मंडळाने यापूर्वी अष्टविनायक, मुंबईचा सिध्दीविनायक, मय्यरची देवी, वैष्णोदेवी यासह अनेक देवी देवतांची गणेशजीच्या रूपात प्रतिकृती साकार केली आहे. यावर्षी नागपूरच्या टेकडीचा गणपती साकार करताना, चौकात मोठे वृक्ष उभारले असून मंदिरात निर्माण केलेला देखावा गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडीत आहे. विविधांनी गणरायांच्या प्रतिकृती साकारून त्यातून समाजप्रबोधन करणाऱ्या सन्मित्र गणेश मंडळाला यापूर्वी उत्कृष्ठ देखावा व समाजप्रबोधन केल्यामुळे जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित केले आहे. गणेशपुरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भंडारा शहरासह जिल्ह्यातुनही हजारो गणेशभक्त येतात. या भक्त व बालकांच्या मनोरंजनासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने खुल्या पटांगणावर आनंदमेळा सुरू करण्यात आला आहे. यात विविध प्रकारचे झुले सोबतच रोषणाई गणेश भक्तांचे आकर्षण ठरले आहे. रात्री उशिरापर्यंत भक्तांची मांदियाळी सुरू असते. गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवादरम्यान आरोग्य शिबिर, रक्तदान, नेत्र शिबिर, रांगोळी स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.सुमारे १० हजार लोकसंख्येच्या गणेशपुरात वेगवेगळे राजकीय पक्षांचे अस्तित्व आहे. मात्र गणेशोत्सात हे राजकीय हेवेदावे विसरून गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना अखंडीतपणे राबविण्यात येत आहे. गावालगत वैनगंगा नदी वाहते. नदीच्या महापुराचा फटका नागरिकांना बसला होता. अशांना मंडळाने पुढाकार घेऊन भोजन व अन्नदान दिले. सोबतच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. गणरायाचे विसर्जन करण्यापूर्वी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. परिसरातील सुमारे २५ हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. गणरायाचे विसर्जन अत्यंत साध्यापध्दतीने होते. ढोल-ताशा किंवा डिजेचा यासाठी वापर न करता भजन मंडळींच्या माध्यमातून दुपारीच गणरायाचे वैनगंगेच्या नदीपात्रात विधिवत विसर्जन केल्या जाते.
गणेशपुरात अवतरला टेकडीचा गणराया
By admin | Updated: September 3, 2014 23:08 IST