भंडारा : राज्य शासनाच्या तंटामुक्ती गाव अभियान योजनेला गावा-गावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकारी यांचे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा महाराष्टÑातील ग्रामीण भागातून फज्जा उडाला आहे. भारत स्वतंत्र झाला, कायदे मंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची स्वतंत्र रचना करण्यात आली. खर्या अर्थाने लोकशाही व्यवस्थेला सुरुवात झाली. वाढती लोकसंख्या, सत्ता स्पर्धा, भौतिक संचय यातून ग्रामीण भागातील भांडणे, वाद-विवादही वाढतच गेले. न्यायदानाला लागणारा वेळ, पैसा यामुळे न्यायव्यवस्थेबद्दल चीड निर्माण होण्याची वेळ आली. या सर्व परिस्थितीचा विचार करता गावपातळीवरील भांडणे, वाद-विवाद गावातच मिटवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य शासनाने सन २००७-०७ मध्ये तंटामुक्त गाव या नावाने एक अभियान उपक्रम हाती घेतला. प्रत्येक गावच्या ग्रामसभेमधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कााम करणार्या २५ ते ३० लोकांची तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, वकील, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पत्रकार, महिला प्रतिनिधी, समाजसेवक, आदी घटकांचा समावेश असावा असे सूचित करण्यात आले. बहुतांश गावामध्ये खुली चर्चा घडवून येईल अशा स्वरुपाची ग्रामसभाच होत नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री तंटामुक्ती समित्यांची स्थापना झाली. व अनेक गावात तंटामुक्ती समित्यांची स्थापनाच झाली नाही. ज्या गावांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभाग घेतला अशा गावात केवळ दोन वर्षातच तंटामुक्ती समितीला आपले कामकाज बासनात बांधण्याची वेळ आली. सहा वर्षात एकही वाद, भांडणे गावात मिटविले गेले नाही.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर या समित्यांमध्येही फेरबदल झाले आहे. अशी तंटामुक्त गाव राज्यात बहुसंख्य असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रत्येक गावात राजकीय गटबाजी असतेच स्थानिक शासन संस्थेवर ज्या गटाचे वर्चस्व आहे, अशा गटाचे हितसंबंध जोपासणार्यांची तंटामुक्ती समितीवर वर्णी लागली. परिणामी तंटामुक्ती समितीकडून न्याय मिळेल ही आशा फोल ठरली. सुरुवातीला गावातील शेतजमिनीचे वाद, दारु विक्री, शिवीगाळ, हाणामारी, महिला अत्याचार, भावबंदकीच्या तक्रारी तंटामुक्ती समितीकडे आल्या. समितीतील २५-३० पदाधिकारी सदस्य तंटा मिटविण्यासाठी उपस्थित नसायचे. केवळ दोन-चार व्यक्ती वाद मिटविण्याचा प्रयत्न करायची. त्यातही राजकीय गटबाजीच्या प्रभावामुळे तंटामुक्ती समितीकडे तक्रार करण्याऐवजी सरळ पोलिसात तक्रारी दाखल झाल्याचे दिसते. (नगर प्रतिनिधी)
तंटामुक्ती गाव अभियानाचा फज्जा
By admin | Updated: May 11, 2014 23:13 IST