ग्रीपविनाच विद्युत प्रवाह : कार्यालयात साहित्याचा अभावरंजित चिंचखेडे - चुल्हाडसिहोरा परिसरातील गावांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी सिंगल फेज योजना सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी स्वतंत्र कार्यालय मंजूर करण्यात आले असले तरी नियोजनाचा अभाव आणि साहित्याच्या तुटवड्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात जिवघेणा विद्युत प्रवाह सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीतून उघडकीस आलेला आहे.तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील ४७ गावांना सुरळीत विद्युत पुरवठा व नियंत्रण ठेवण्यासाठी ३३/११ केव्ही उपकेंद्र मंजुर करण्यात आले आहे. या विज वितरण कंपनी कार्यालयात सिहोरा १ आणि सिहोरा २ अशी विभागणी करण्यात आलेली आहे. या विभागांना स्वतंत्र दोन शाखा अभियंते कार्यरत आहे. गाव स्तरावर लाईनमन नियुक्त आहेत. परंतु महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामीण भागाील नागरिक त्रस्त झालेले आहेत. लाखांदूर तालुक्यात मागील दोन महिन्यात विजेच्या तारांना स्पर्श होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता.नागरिकांना २४ तास विज पुरवठा करण्यासाठी सिंगल फेज योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची गावा गावात स्वतंत्र विद्युत ट्रान्सफार्मर लावण्यात आलेले आहेत. याच गावात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरवठा करण्याकरीता स्वतंत्र थ्री फेज विद्युत ट्रान्सफार्मर आहेत. गावकरी आणि शेतकरी यांना विद्युत पुरवठा करताना नियोजनबद्ध कृती आराखडा महावितरणने राबविला आहे. परंतु विजेचा लपंडाव आणि वाकलेले विजेचे खांब आणि लोंबकळलेल्या तारामुळे विद्युत प्रवाह वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे गावागावात महावितरण विरोधात रोष आहे. मागील महिन्यात वीज महावितरण कंपनीकडून वाकलेले खांब आणि लोंबकळलेले तारे दुरूस्तीचे कामे सुरू करण्यात आली होती. या कामांना गती देण्यात आली असता, नागरिकांना सुरळीत विद्युत पुरवठा होणार असल्याची अपेक्षा वाढली होती. ही अपेक्षा हवेत विरली, साहित्य संपल्याने फार्म अर्धवट ठेवण्यात आली आहे. विज वितरण कंपनी बिल देयकांचे विलंब खपवून घेत नाही. महिनाभराचे थकीत बिल देयक होताच, विज पुरवठा खंडीत करण्याचे देत आहे. परंतू वीज ग्राहकांना सेवा आणि सुरक्षा देताना असे निर्देश देण्यात येत नाही. यामुळे गावात असंतोष आहे. ‘लोकमत’ने परिसरात अशा सुरक्षात्मक उपाय योजनाचा शोध घेतला असता शेतकरी असुरक्षित दिसून आले. सिहोरा, येरली आणि चुल्हाड या तीन जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात फेरफटका मारला असता, अनेकांनी संतापजनक गाऱ्हाणे मांडली आहेत. परसवाडा शेतशिवारात विद्युत ट्रान्सफार्मर शेतकऱ्यांना कर्दनकाळ ठरावे असेच आहेत. हे ट्रान्सफार्मर उघडे असून वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने गावातील काही तरूण, विज जोडणी करीत आहेत. शेतीला पाणी वाटपाची चिंता असल्याने जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याचे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी सांगितले आहे. मोहगाव खदान शिवारात विजेचा लपंडाव नाकी नऊ आणत आहे. या गावात कमी दाबाने नागरिक हैराण झाली आहेत. वर्षभर हीच अवस्था राहत असल्याने पंखे शो पीस ठरत आहेत. या गावात विद्युत ट्रान्सफार्मर सुरू करण्यात आले नाहीत, अशी माहिती उपसरपंच उमेश्वर कटरे यांनी दिली.जंगल व्याप्त भागात वास्तव्य करणारे गावातील नागरिक हैराण आहेत. या गावात ८ तासच विद्युत पुरवठा होत आहे. धनेगाव, मुरली शिवारात विजेची समस्या बिकट आहे. या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांना झाडांचे स्पर्श झाले आहे. रात्रभर गावकऱ्यांना अंधारात काढावे लागत असल्याचे सरपंच छगनलाल पारधी यांनी सांगितले. गोंडोटोला शेतशिवारात विद्युत ट्रान्सफार्मर जळालेला असल्याने ९० शेतकरी अडचणीत आलेली आहेत. विजेची समस्या निकाली काढण्यासाठी अनेक निवेदन देण्यात आली आहेत. परंतु साहित्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. मोहाडी खापा गावांना जोडणारा प्रमुख रस्ता विजेच्या खांबाच्या गराड्यात असल्याची माहिती माजी सरपंच अंबादास कानतोडे यांनी दिली.
जीवघेणा विद्युत प्रवाह
By admin | Updated: September 3, 2014 23:06 IST