जांब (लोहारा) : लघु पाटबंधारे विभाग शाखा आंधळगाव अंतर्गत येत असलेला बेटेखारी तलावाचा कॅनल क्र. १ चा गेट उघडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.बेटेखारी तलावाचा गट क्र. १ २० वर्षापासून नादुरुस्त असल्याने उघडत नव्हता व त्यामुळे टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचत नव्हते. यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने या तलावातील गेट क्र. १ च्या शेतकऱ्यांना पाणी अत्यंत आवश्यक होते. या गेटकडे अधिक लाभक्षेत्र येत होते. पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे धानपिक करपू लागले होते. मोहाडी तालुका युवक राकाँ अध्यक्ष जगदिश उके तसेच परिसरातील शेतकरी भेटून सदर समस्या कथन केली. तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्याची दखल घेऊन लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बॅनर्जी व शाखा अभियंता हटवार यांना त्वरीत बेटेखारी बोथली तलावाचे पाणी सोडण्याचे आदेश आमदारांनी दिले. लगेच संबंधित अधिकाऱ्यांनी बेटेखारी बोथली तलावाचे कॅनल क्र. एक च्या गेटची पाहणी केली. गेट खुप वर्षापासून बंद असल्याने गेटवर खुप जंग चढलेला असल्याने ते जाम झालेले होते. ते गेट उघडणे कठीण होते. तेव्हा त्या गेटच्या खाली खोदून जॅक लावून अखेर गेट उघडून शेतकऱ्यांच्या धान पिकाला पाणी सोडण्यात आले. गेट उघडल्याने आता टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना मिळाले बेटेखारी तलावाचे पाणी
By admin | Updated: August 31, 2014 23:36 IST