करडी (पालोरा) : करडी परिसरातील शेतकरी पाण्यासाठी अडचणीत असतांना मोहगाव व कान्हळगाव येथील विद्युत जनित्र बंद आहेत. अनेकदा लेखी व तोंडी माहिती देवूनही विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. विभागाला जाग यावी, जनित्र कार्यरत व्हावे म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी ४ सप्टेंबर रोजी करडी विद्युत कार्यालयात धडक दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नविन जनित्र बसविण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकरी समाधानाने परतले. शेतकरी विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांकडून अनेकदा कर्तव्यात कसूर केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांचेवर कारवाई होत नाही. मुंढरी व कान्हळगांव येथील शेतकरी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बेताल वागण्याने वैतागले आहेत. त्यांच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या, परंतु कामकाज ‘जैसे थे’ आहे. विद्युत विभागाच्या गैरकारभाराचा पाढा वाचत कान्हळगांव येथील शेतकऱ्यांनी तिन विद्युत जनित्रांच्या दुरुस्तीसाठी ४८ तासांचा अल्टीमेटम या अगोदरच दिला होता. शेतकऱ्यांचा राग शांत व्हावा म्हणून तातडीने भंडारा येथून नविन विद्युत जनित्र लावले गेले. मात्र अजूनही कान्हळगांव मार्गावरील एक जनित्र बंद अवस्थेत आहे. जनित्राच्या दुरुस्तीचे सौजन्य विभागाकडून दाखविले गेले नाही. मोहगांव नाल्यावरील जनित्र बंद असल्याची माहिती शेतकऱ्यांनी विभागाला दिली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली नाही किंवा बदलवून दुसरे जनित्र बसविण्याची व्यवस्था केली नाही. कान्हळगांव व मोहगांव येथील दोन जनित्र बंद अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांना पाण्याची गरज असतांना विभाग दुर्लक्ष करीत असल्याची भावना वाढीस लागल्याने अखेर शेतकरी महेंद्र शेंडे यांचे नेतृत्वात करडी विद्युत विभागावर धडकले. अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर कार्यकारी अभियंता परांजपे यांचेशी महेंद्र शेंडे यांनी भ्रमणध्वनीहून चर्चा केली. (वार्ताहर)
विद्युत कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक
By admin | Updated: September 6, 2014 01:35 IST