तुमसर : नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात तत्परतेअभावी तुमसर व मोहाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील विविध बांधकामांची ६ कोटी ७३ लक्ष रूपयांचा निधी राज्य शासनाकडे परत गेला, असा आरोप माजी आ.अनिल बावनकर यांनी केला आहे.२५/१५ अंतर्गत जिल्हा परिषद विभागांतर्गत ४ कोटी ५८ लक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागातील २ कोटी १५ लाखांचे विविध विकास कामांचे बांधकामाला राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली होती. तेवढा निधी सुद्धा उपलब्ध करून दिला होता. सर्व सोपस्कार नियमाप्रमाणे पार पाडल्यानंतरही संबंधित दोन्ही विभागाने कामाचा आदेश काढला नाही. राज्य शासनाने ५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कामांचा आदेश काढलेल्यांनाच निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथे संबंधित मंजूर निधी राज्य शासनाकडे परत गेला आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात या निधीतून ३ ते १५ लाखापर्यंतची कामे केली जाणार होती. वेळेत कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येथे कारवाईची मागणी माजी आ.अनिल बावनकर यांनी केली. ही कामे विशेष बाबी अंतर्गत होती. या कामांना तांत्रिक मान्यता मिळाली होती. कामाचे अंदाजपत्रक तयार झाले होते. कामे करण्याकरिता नियमानुसार विविध कागदपत्रांची पूर्तता केली नाही. ग्रा.पं.चे प्रमाणपत्र प्राप्त झाले नव्हते. कारवाई पूर्ण झाले नाहीत म्हणून कामाचे वर्क आर्डर दिले नाही. जि.प. चे कार्यकारी अभियंता सेलोकर यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (तालुका प्रतिनिधी)
वर्क आॅर्डर न मिळाल्याने सात कोटींचा निधी परत
By admin | Updated: November 18, 2014 22:50 IST