आदेशाला केराची टोपली : अन्य शाळा असल्यावरही ५ वीचे वर्ग सुरुवरठी : इंग्रजी माध्यम शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असल्याची ओेरड सुरु आहे. पण जिल्ह्यात मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा ऐकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार निर्देशनास येत आहेत. एकाच गावात असलेल्या प्राथमिक शाळांनी इयत्ता ५ वा वर्ग सुरु केल्यामुळे इतर शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यम पूर्वप्राथमिक केंद्र सुरु केल्यामुळे अंगणवाडी केंद्रात घट झाली आहे. जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने यात लक्ष दिले नाही तर जिल्हा परिषद शाळा बंद होण्यास जि.प. शाळाच कारणीभूत ठरणार यात शंका नाही.शिक्षणाचा कायदा २००९ अंतर्गत शासनाने प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा वर्ग संख्या वाढविली. नव्या धोरणानुसार प्राथमिक म्हणजे इयत्ता १ ते ५, उच्च प्राथमिक इयत्ता ६ ते ८ व माध्यमिक इयत्ता ९ ते १० असे करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या शाळा पूर्वीच्या धोरणानुसार प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ते ४ पर्यंतचे व उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ते ७ पर्यंतचे वर्ग सुरु होते, अशा ठिकाणी इयत्ता ५ व ८ चे वर्ग सुरु करण्याचे शासनाने ठरविले. राज्यात नियमाची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रस्ताव मागितले होते. विविध तालुक्यातील शाळांचे प्रस्ताव आले. मोहाडी तालुक्यातून इयत्ता ५ वी करिता १६ व ८ वी करिता २ प्रस्ताव प्राप्त झाले. ९ जून रोजी शिक्षण व क्रीडा विषय समितीच्या सभेत मोहाडी तालुक्यातील मुंढरी, सिहोरा, टाकला, काटेबाम्हणी, सालेबर्डी, देऊळगाव या ठिकाणी इयत्ता ५ वी व टांगा व धोप या ठिकाणी इयत्ता ८ वी करीता मंजूरी प्रदान करण्यात आली. वरठी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ यांना मंजुरी नाकारण्यात आली होती. प्रस्ताव मंजुरीकरिता एका शाळेपासून दुसऱ्या शाळेचे अंतर कमी असून जिल्हा परिषदेची जि.प. हायस्कुल शाळेत इयत्ता ५ ते १२ पर्यंत वर्ग असल्यामुळे मंजुरी नाकारण्यात आली. पण या शाळांना शिक्षण समितीचा अहवाल वेळेवर पोहचविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी दिरंगाई केल्यामुळे शाळेत इयत्ता ५ वा वर्ग सुरु करण्यात आले. प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वा वर्ग सुरु केल्यामुळे स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुलचे वर्ग बंद होण्याच्या स्थितीत आले आहे. साकोली, लाखनी व पवनी येथे नव्याने ५ वा वर्ग सुरु करण्याची आवश्यकता नसल्याचे गट शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.ज्या ठिकाणी १ ली ते ४ थी पर्यंत शाळा आहे, व १ कि.मी. परिसरात ५ वी करीता त्याच माध्यमाची शाळा असल्यास अन्य शाळामध्ये ५ वी वर्ग देण्यात येवू नये आणि ३ कि.मी. परिसरात ८ वी ला वर्ग उपलब्ध असल्यास त्यांनाही मंजुरी देण्यात येवू नये याबाबत शिक्षण उपसंचालकांनी दि. ७ जुलैच्या पत्रात स्पष्ट सूचना दिली आहे. त्या आदेशाला शाळांनी केराची टोपली दाखवून वर्ग सुरु केल्यामुळे सुरु असलेल्या इतर शाळा अवसायानात निघाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा एकमेकांवर कुरघोडी करीत असल्याचे दृश्य आहे. (वार्ताहर) नियमाचा घोळ कायमप्राथमिक वर्गाचा स्तरात बदल केल्यानंतर शासनाने इतर शाळेत सुरु असलेला ५ किंवा ८ वा वर्ग बंद करावयास पाहिजे होता. आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी जिल्ह्यांचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी प्रस्ताव मागायला हवे होते. नियमाचा घोळ केल्याने अधिकाऱ्यांचा अज्ञान कारणीभूत ठरले. कारवाई झाल्यास नाहक शिक्षकाचा बळी जाईल. अंगणवाडी केंद्रात घटजिल्हा परिषद शाळा चालविणे आणि नोकरी टिकविणे शिक्षकांसाठी कसरत आहे. जिल्ह्यात काही प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमाचे पूर्व प्राथमिक केंद्र सुरु करण्यात आले. गावात या प्रकारचे वर्ग सुरु झाल्यामुळे अंगणवाडीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. अंगणवाडीत होणारे सर्व पोषण आहार, वैद्यकीय तपासणी, कुपोषण यावर प्रभाव पाडून शेकडो अंगणवाडी सेविकांवर भविष्यात उपासमार होणार यात शंका नाही.
जिल्हा परिषद शाळांची अशीही कुरघोडी
By admin | Updated: July 28, 2016 00:30 IST