भंडारा : धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी न केल्यामुळे काळ्या फिती लावून तहसील कार्यालयाजवळ त्रिमूर्ती चौक येथे धरणे देत शासनाचा निषेध करण्यात आला.कार्यक्रमाला भंडारा तालुका धनगर जमात कृती समितीचे अध्यक्ष नरेश पडोळे, उपाध्यक्ष सुरेश कवाने, सचिव मनोहर अहीर यांनी भाषणामधून शासनाचा निषेध केला. कार्यक्रमात विठ्ठल अहीर, नत्थू घटारे, राजकुमार मोरे, मधुकर नवरंगे, पंडीत पांडे, जयशंकर घटारे, विजया चाफले यांची भाषणे झाली. धनगर, धनगड ही एकच जमात असून केवळ इंग्रजी लिपीतील ड व देवनागरीत र अशा भाषेमुळे झालेला फरक आहे. केंद्राने प्रसारीत केलेल्या सूचीप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर ओरान, धनगड असा उल्लेख आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५८) (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आदेश अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६ चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग क्र. १ मध्ये नमुद केल्याप्रमाणे अनुसूचित जमाती यादी क्रमांक ३६ वर ओरान, धनगर अशा स्पष्ट उल्लेख आहे. जनजातीय कार्यालय मंत्रालय भारत सरकारच्या प्रत्येक वार्षिक अहवालामध्ये इंग्रजी यादी मध्ये उल्लेख आहे. हिंदी (देवनागरी) लिपीत असलेल्या याच यादीत ओरान, धनगर असे नमूद केले आहे. केवळ एका अक्षर फरकामुळे गेली ६५ वर्षे धनगर जमातीस अनुसूचित जमातींना मिळणाऱ्या सवलती दिल्या नाही. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी काल सोमवारी तहसील कार्यालयावर सकाळी ११ ते ५ पर्यंत धरणे आंदोलन काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला. कार्यक्रमात २०० धनगर जमात बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक कृती समितीचे अध्यक्ष नरेश पडोळे यांनी तर संचालन तथा आभार प्रदर्शन मनोहर अहीर यांनी केले. (प्रतिनिधी)
धनगर समाजाचे धरणे
By admin | Updated: September 2, 2014 23:31 IST