साकोली : वन कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गढकुंभली टेकडीवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन झाले आहे. अवैध उत्खनणामुळे या टेकडीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरीत आहे. माहितीनुसार, नर्सरी टेकडी ही गडकुंभली टेकडीला लागून आहे. या टेकडीवर अनेक झाडे झुडपी आहेत. तरीही या टेकडीवरून अवैधरीत्या मुरूमाचे खोदकाम राजरोसपणे सुरू आहे. रात्री हे मुरूम नेले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या. मात्र वन अधिकार्यांनी थातुरमातूर चौकशी करून प्रकरण दाबले. या टेकडीची चौकशी केल्यास या टेकडीवरून हजारो ट्रॅक्टर मुरुमाची चोरी झाली आहे. यामुळे अनेक बहुगुणी झाडाची नासाडी झाली तसेच शासनाचा महसूलही बुडाला आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास खरे सत्य उघडकीस येऊ शकते. गिट्टीचेही उत्खनन मुरूमाबरोबरच या टेकडीवरून गिट्टीचेही उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. परिसरातील नागरिक टेकडीवरील मोठ मोठाले दगड फोडून ती बारीक करतात व अवैधरीत्या ही गीट्टी ट्रॅक्टर मालकांना विकतात. याचीही चौकशी झाली पाहिजे. साकोली परिसर नैसर्गिक साधनसामग्रीने नटलेला आहे. परिसरात वने व टेकड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचे जतन होणे काळाची गरज आहे. मात्र वन अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी दुर्मीळ होत असलेली वने व टेकडी आता नष्ट होत आहेत. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या काळात टेकड्या फक्त नकाशावरच पाहाव्या लागणार आहेत. या अवैध उत्खननाची चौकशी झाली पाहिजे व वन अधिकार्यावर कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. भंडारा जिल्ह्यात गौण खनिजांची विपूल संपदा आहे. या खनिजांच्या संरक्षणाची जबाबदारी वन विभागाची तथा महसूल विभागाची असते. मात्र जिल्ह्यात खनिजांची सर्रास चोरी होत असतानाही संबंधित विभाग मुग गिळून गप्प बसून असतात. यासंबंधी अनेकदा विविध संघटनांनी खनिज चोरीवर आळा घालण्याची मागणी केली होती. मात्र थातूरमातूर कारवाई करून प्रकरण थंड बस्त्यात टाकल्याचे अनेक उदाहरण दिसून येतात. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
गढकुंभली टेकडीचे अस्तित्व धोक्यात
By admin | Updated: May 11, 2014 00:05 IST