वरठी : सनफ्लॅग प्रवेशद्वाराजवळ प्रवासी निवारा आहे. या प्रवासी निवाऱ्यासमोरच्या खुल्या जागेत अव्यवस्थित उभ्या राहणार्या जड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनाच्या गर्दीत प्रवासी निवारा दिसत नाही. यामुळे येथून प्रवास करणार्या प्रवासी व विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून प्रतिक्षा करावी लागते. या प्रवासी निवार्यासमोर उभ्या वाहनांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात असून राज्य महामार्गावरुन धावणार्या वाहनांना कमालीचा त्रास होत आहे.वरठी येथे रेल्वे स्थानकाजवळ एस.टी. बसस्थानक आहे. दोन दशकापूर्वी या एस.टी. स्थानकावर येणार्या जलद बस बंद करण्यात आले. सर्व जलद बस भंडारा-तुमसर राज्य महामार्गावरुन धावतात. या राज्य मार्गावर सनफ्लॅग प्रवेशव्दाराजवळ असलेल्या प्रवासी निवार्यावर जलद बस थांबतात. गावात असलेल्या एस.टी. बस स्थानकाची वाईट अवस्था व कमी प्रमाणात धावणार्या बसेसची संख्या आहे. यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवासी सनफ्लॅग प्रवासी निवार्यावरुन प्रवास करतात.भंडारा-तुमसर राज्य महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. दिवस-रात्र या मार्गावरुन वाहनाची रेलचेल राहते. त्यामुळे सर्वात जास्त प्रवाशी व विद्यार्थी या थांब्यावरुन प्रवास करतात. पण या परिसरात मोठ्या प्रमाणात उभ्या असलेल्या वाहनांमुळे येथून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. सनफ्लॅग कंपनीत वाहतूक करणारे हे सर्व वाहने कंपनीत जागा नसल्यामुळे व तपासणीच्या नावावर होणार्या लेटलतीफीशाहीमुळे भर रस्त्यावर उभे राहतात. रस्त्यावर उभ्या वाहनाच्या गर्दीमुळे दुतर्फा रहदारी क्षमतेचे हा रस्ता दिसत नाही. दररोज या प्रवासी निवार्यासमोर व रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनामुळे अडचण निर्माण होते. यापुर्वी या परीसरात अपघात झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.सदर रस्ता हा प्रवाशांबरोबर नागरिकांकरीता धोकादायक ठरत आहे. प्रवाशी निवार्यासमोर उभ्या वाहनांमुळे प्रवाशी रस्त्यावर किंवा त्या वाहनासमोर येऊन बसची वाट पाहतात. अशावेळी अचानक सुरू होणारे वाहन बुचकाळ्यात पडते व किरकोळ अपघात घडतात. या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचे चालक दादागिरी करतात. मागे-पुढे न पाहता अचानक वाहन जोराने मागे-पुढे करण्यामुळे समोरुन येणार्या दुचाकीस्वार सरळ त्यावर आदळतात. एकंदरीत सदर स्थळ हे प्रवाशी व विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर उभ्या वाहनावर कारवाईची मागणी गावकर्यांनी केली आहे.सनफ्लॅग कंपनीवर कारवाई कराजगनाडे चौक ते सनफ्लॅग गेटसमोर होणारी वाहनाची गर्दी ही सनफ्लॅग कंपनीमुळे होते. हे सर्व वाहने कंपनीत येणारे आहेत. नियमानुसार या वाहनाकरीता वाहनतळ बनवण्याची जबाबदारी सनफ्लॅग कंपनीची आहे. पण सनफ्लॅग कंपनी मार्फत वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे सर्व वाहन रस्त्यावर उभे राहतात. त्यामुळे सनफ्लॅग कंपनीवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी सरपंच संजय मिरासे यांनी केली आहे. (वार्ताहर)
प्रवासी निवाऱ्यासमोर वाहनांची गर्दी
By admin | Updated: May 9, 2014 01:44 IST